घरमहाराष्ट्रशिवसेनेसोबतचे दोन्ही काँग्रेसचे सरकार लुळेपांगळे

शिवसेनेसोबतचे दोन्ही काँग्रेसचे सरकार लुळेपांगळे

Subscribe

संजय निरुपम यांचा घरचा आहेर

शिवसेनेला समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस सकारात्मक बनली आहे. मात्र काँग्रेसच्या या निर्णयाला आता पक्षांतर्गत विरोध होऊ लागला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सेनेसोबतचे दोन्ही काँग्रेसचे सरकार हे लुळेपांगळे सरकार असेल, अशा शब्दांत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

शिवसेनेसोबत काँग्रेसने सत्तेत सहभागी होऊ नये. मागील कालखंडात उत्तर प्रदेशात बसपासोबत आम्ही जी चूक केली होती, त्याच चुकीची पुनरावृत्ती होत आहे. त्यावेळी काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात इतका भुईसपाट झाला की अजून तो उठू शकला नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असणार, त्याचे नेतृत्व शिवसेना करणार आणि त्यात काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर असणार, हे काँग्रेससाठी निश्चितच धोकादायक असेल, अशी खंत निरुपम यांनी व्यक्त केली. सत्तेच्या लालसेपोटी राज्यातील काँग्रेसचे नेते आणि आमदार हे सोनिया गांधी यांच्यावर दबाव टाकत आहेत. ते काँग्रेसचे नुकसान करत आहेत. काँग्रेसचा हा निर्णय अल्पकालीन फायद्याचा आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता हे शिवसेनेचे पाप आहे. या पापाचे भागीदार काँग्रेसने व्हावे, हे चुकीचे आहे. शिवसेनेसोबत सत्तेत राहून काँग्रेस दीर्घकाळ राजकारण करू शकणार नाही, असेही निरुपम म्हणाले.

- Advertisement -

मुस्लीम कार्यकर्त्यांचे सोनिया गांधींना पत्र
नगर जिल्ह्यातील संगमनेरच्या मुस्लीम युवक कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवून सत्तेसाठी शिवसेनेशी आघाडी करू नका, अशी विनंती केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमधील या संघटनेच्या १०० कार्यकर्त्यांच्या या पत्रावर स्वाक्षर्‍या आहेत. देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय वाटचालीत काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचाराला साथ आणि पाठबळ देऊन मुस्लीम समाजाने पक्षाच्या धोरणाला नेहमीच पाठिंबा दिला. देशातील राजकीय वातावरण वेगळ्या दिशेने जाणारे असले तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच यापूर्वी संगमनेर तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुस्लीम समाजाने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन विजयी केले. शिवसेना भाजपसारख्या जातीयवादी पक्षांचा आणि विचारांचा पराभव केला, असेही या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -