घरमहाराष्ट्रएक्झिट पोलचे उलटेच अंदाज! राज ठाकरेंच्या सभांचा नक्की फटका कुणाला?

एक्झिट पोलचे उलटेच अंदाज! राज ठाकरेंच्या सभांचा नक्की फटका कुणाला?

Subscribe

राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत अमित शहा-नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राज्यभर रान पेटवलं होतं. त्याचा परिणाम शिवसेना-भाजप युतीला निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या जागांवर होईल असं देखील म्हटलं जात होतं. मात्र, एक्झिट पोलमध्ये चित्र काहीसं वेगळं दिसत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात जागा लढवत होते काँग्रेस-राष्ट्रवादी. मात्र खरी चर्चा आणि प्रचाराचा धुरळा उडवून दिला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईल प्रचारसभांनी. निवडणुका जाहीर झाल्यापासून राज ठाकरेंनी राज्यभर १० प्रचारसभा घेतल्या आणि या प्रत्येक प्रचारसभेमध्ये मोदी-अमित शहामुक्त भारत करण्याची हाक त्यांनी जनतेला घातली. या सभांमधून त्यांनी मोदींच्या दुटप्पी विधानांचे अनेक व्हिडिओ देखील दाखवले. त्यामुळे यंदा भाजपची पारंपरिक मतं आणि शिवसेनेची मराठी मतं दूर जातील आणि याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये काहीसं वेगळं चित्र दिसू लागलं आहे.

भाजपच्या फक्त काही जागा कमी होणार?

महाराष्ट्रातल्या जागांसाठी सी व्होटर, टाईम्स नाऊ, नेल्सन अशा आघाडीच्या सर्वेक्षण कंपन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. मात्र, या सगळ्यांनीच राज्यात सेना-भाजपच्या जागा काही प्रमाणात कमी जरी होत असल्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादीला त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या मोदी-अमित शाह विरोधी प्रचाराचं फलित भाजपच्या फक्त काही जागा कमी होण्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

काय म्हणतात एक्झिट पोल?

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला २३ जागा, शिवसेनेला १८ जागा, काँग्रेसला २ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप-१७, शिवसेना-१७, काँग्रेस-४, राष्ट्रवादी-१ तर इतर-१ असा अंदाज नेल्सनने वर्तवला आहे. तर भाजप-शिवसेना – ३८, काँग्रेस-राष्ट्रवादी १० तर इतर ० अशी आकडेवारी टाईम्स नाऊने दिली आहे. त्याव्यतिरिक्त सी व्होटरने सेना-भाजप – ३४, काँग्रेस-राष्ट्रवादी – १४ तर इतर – ० अशी आकडेवारी दिली आहे. या तिनही अंदाजांची सरासरी काढल्यास एकूणच राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप प्रत्येकी १७ ते १८ जागांच्या आसपास विजयी होण्याची शक्यता आहे. मात्र, इथेच राज ठाकरेंच्या सभांचा फॅक्टर समोर येतो.


हा व्हिडिओ पाहिलात? – भाजपच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेवरून राज ठाकरे मोदींवर बरसले

काय अर्थ आहे या एक्झिट पोलचा?

वास्तविक राज ठाकरेंनी राज्यभर सभा घेतल्यानंतर शिवसेना-भाजपला होणारं मतदान आणि त्यांना मिळणाऱ्या जागा, यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, जागांचा विचार करता राज्यात सर्वाधिक जागा घेण्यापासून राज ठाकरेंच्या सभा सेना-भाजपला दूर ठेऊ शकणार नाहीत, असाच अंदाज एक्झिट पोलवरून दिसून येतोय. विशेषत: शिवसेनेची मराठी मतं लांब जाऊन शिवसेनेच्या जागा कमी होतील, असा अंदाज फोल ठरत शिवसेनेची फक्त एखादी जागा कमी होईल असं सर्वच पोल सांगत आहेत. भाजपला राज ठाकरेंच्या सभांचा काही प्रमाणात फटका बसणार असून त्यांच्या ६ ते ७ जागा कमी होण्याची शक्यता या एक्झिट पोलवरून दिसू लागली आहे. मात्र, तरीदेखील राज्यात सेना-भाजप युती सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून समोर येईल असा कौल या पोलनी दिला आहे.

- Advertisement -

मतांच्या टक्केवारीवर काय पडेल प्रभाव?

दरम्यान, उमेदवारांना आणि पक्षांना पडणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर राज ठाकरेंच्या सभांचा किती परिणाम होईल, हे मात्र २३ तारखेला अंतिम निकाल हाती आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. तिथे राज ठाकरे फॅक्टर दिसू शकेल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -