घरट्रेंडिंगनामवंत लेखिका कविता महाजन कालवश!

नामवंत लेखिका कविता महाजन कालवश!

Subscribe

नामवंत लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज संध्याकाळी पुण्यामध्ये निधन झाले. कविता महाजन यांच्या ‘ब्र’, ‘कुहू’ आणि ‘भिन्न’ या कांदबरी विशेष गाजल्या. बाणेरच्या चेलाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. गेल्या महिन्याभरापासून त्या पुण्यात आपल्या मुलीकडे वास्तव्याला होत्या. ताप येत असल्यामुळे तसंच फुफ्फुसाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांच्या मुलीने त्यांना बाणेरच्या चेलाराम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारदरम्यान कविता यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कविता महाजन मुळच्या नांदेडच्या होत्या, त्यांचा जन्मही नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाच्या माजी सचिव- एस.डी. महाजन यांच्या त्या कन्या. कविता यांचे संपूर्ण शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन विद्यालयात झाले. पुढे जाऊन त्यांनी नांदेडच्याच पीपल्स महाविद्यालयातून आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. कविता महाजन यांनी मराठी साहित्यामध्ये M.A. ही पदवी संपन्न केली होती.

- Advertisement -

महिलांची वेदना, त्यांचं सोसलेपण इतकंच नाही तर त्यातील इतर भावनिक, मानवी जाणिवांचे कंगोरेही तिच्या लेखनात सातत्याने येत होते. स्त्रीवादी म्हणून ओळखला जाणारा केवळ विद्रोह नाही तर त्याचे सर्वच आयाम कविताच्या कवितेत येत होते. तिच्या लेखनाचंही हेच सार होतं. या लेखनाला कुठलीही सीमारेषा अशी नव्हती. एका समान स्तरावर महिलांच जगणं खर्‍या अर्थाने तिने मांडलं होतं. त्यात सातत्य होतंच. लेखन शैली, प्रतिभेचा विषय हा नंतरचा आहे.

मात्र कविता महाजनचं लेखन अस्सल होतं. तिच्या अस्सल जगण्यासारखं. एखादा विषय भावला, त्यावर लिहावसं वाटलं तर उथळ किंवा जुजबी माहितीवर लिहलेले अनुभव तिच्या लेखनात कधीच नव्हते. एखादी गोष्ट समजून घेण्याची तिची तीव्र इच्छा असायची. तिच्या कादंबरीचंही तसंच होतं. एखाद्या विषयावर कादंबरी लिहायची ठरली की त्या विषयाचे विविध कंगोरे, त्यातले दुवे, त्याची माहिती, संबंधित समाजजीवन आणि विषयाची इत्यंभूत माहिती घेणं एवढंच करून तिच्या लेखनाची गरज कधीही भागत नव्हती. त्या विषयाशी संबंधित माणसांच जगणं त्यांचे अनुभव घेण्यासाठी ती विषयावर संशोधन करत होती. तिच्या कादंबरी लेखनाला त्यामुळेच एक वास्तववादी आणि परखड असा मानवी आयाम मिळत होता. त्यातील संदर्भ चोख असायचे, कल्पनाविलासात रममाण होणं हा तिच्या स्वभावाचा आणि लेखनाचाही भाग नव्हता. त्यामुळे ती जे लिहायची ते जगणं आत्मसात करण्याचा तिचा प्रयत्न कायम होता. त्यामुळे तिच्या कादंबर्‍यांच्या लेखनाचे संदर्भ अस्सल मानवी आणि स्त्रीवादी जाणीवेतून आलेले असायचे. त्यात कृत्रिमता नव्हती.

- Advertisement -

तिच्या दीर्घ कवितेचंही तसंच होतं. हा फॉम तिने तेवढ्याच परिणामकारकपणे हाताळला. मुळातंच अस्सल जाणीवेशी कुठलीही तडजोड न केलेली तिची शैली असल्यामुळे कवितेतही ती तेवढ्याच ताकदीने उमटत होती. आपलं सगळं आयुष्य लेखन आणि कवितेला तिने बहाल केलं होतं. आमच्यासारख्या समकालीन कवयित्री आणि लेखकांसाठी तिचं लेखन महत्वाचं होतंच. साहित्य किंवा कविता काळाच्या ओघात टिकायला हवी. यासाठी आवश्यक ती ताकद आणि जाणीव तिच्या लेखनात होती. ती ओढून ताणून आणलेली अशी कधीच नव्हती.

तिचे शब्द वाचताना याचा प्रत्यय येतोच. हे विद्रोहीपण तिच्या जगण्याचा भाग होतं. महिलांचा आणि एकूणच स्त्रीवादी चळवळीला ऊर्जा आणि आवाज मिळेल असं तिचं लेखन होतं. नव्या कवी, लेखक किंवा कवयित्रींना प्रोत्साहन देणं हा तिच्या स्वभावाचा भाग होता. खुलेपणाने कौतुक करणं आणि इतरांच्या कवितेविषयी बोलणं तिला आवडायचं. त्यात स्वतःच्या लेखनाविषयी जेवढी उत्सुकता आणि आत्मियता तिला होती. तेवढीच जाणीव समकालीन लेखक आणि कवी, कवयित्रींच्या लेखनाबाबत तिला होती. स्त्रीवादी साहित्याचा आवाज म्हणजे तिचं लेखन होतं.

अनुवादाच्या क्षेत्रातही तिचं काम मोलाचं आहे. इस्मत चुगताईंच्या रजईची तिनं मराठीत गोधडी केली. पण केवळ भाषा बदलली मात्र वेदना तिच राहिली. शारिरीक अर्थाने आपण नसलेल्या लेखकाशी मानसिक पातळीवर इतकं समरस होऊन शब्द, भाषेचा पलिकडे केवळ अस्सल जाणीवेचा अनुवाद करणं हे तिच्या अनुवादाचंही वैशिष्ठ्य होतं. त्यामुळेच ते मनाला भिडणारं होतं. त्यात मूळ लेखनाची अनुभूती होती, जरी भाषा बदलली असली तरी बदलेली भाषा ही जाणीवेला अडसर ठरणारी नव्हती. तिच्या लेखनातून आणखी काही इतर भाषांतील ही जाणीव तिने केलेल्या अनुवादातून मराठीत आली असती. तिच्या जाण्याला मी पोकळी म्हणणार नाही.

इतकं तिचं काम महत्वाचं आणि ताकदीचं आहे. तिच्या कविता, कादंबर्‍या आणि अनुवाद तसंच लेखनातील ही मानवी जाणीव अस्सल आहे. त्यामुळे काळाच्या कसोटीवर तिचं लेखन टिकाणारंच, त्यात अस्सल माणूसपण आहे..स्त्रीत्वाचाही पलिकडचं….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -