बस प्रवासात ओळखीचा घेतला गैरफायदा; ४ महिन्यांच्या बाळाचे केले अपहरण

बस प्रवासात ओळखीचा गैरफायदा घेत एका चार महिन्याच्या बाळाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बस प्रवासात ओळखीचा घेतला गैरफायदा

बऱ्याचदा प्रवासात अनेकांच्या ओळखी होतात. मात्र, याच ओळखीचा गैरफायदा घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात बस प्रवासात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी बाळाच्या २३ वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या काही तासात महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत.

असा घडला प्रकार?

अहमदनगर-सातारा महामार्गावरुन तक्रारदार आणि आरोपी या दोन्ही महिला बसने प्रवास करत होत्या. या दरम्यान, दोघींची बसमध्येच ओळख झाली होती. तक्रारदार तरुणीसोबत तिचे चार महिन्यांचे तान्हे बाळही होते. पुण्यात स्वारगेट बसस्थानकावर दोघीही उतरल्या आणि हडपसरला निघाल्या. प्रवासात झालेल्या ओळखीनंतर आरोपी महिलेने विश्वास संपादन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला घेऊन खायला आणण्यासाठी निघून गेली ती परत आलीच नाही.

नेमके काय घडले?

लोणी गावात राहणारी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन तिने चार महिन्याच्या बाळाला घेऊन अहमदनगर गाठले. त्यानंतर तिने नगर ते सातारा असा बसने प्रवास सुरु केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली.

काही वेळाने आरोपी महिलेने तक्रारदार तरुणीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या. तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळाला फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळाचा शोध घेऊन बाळाची सुखरुप सुटका केली.


हेही वाचा – अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये NCP नेत्यांवर आरोप!