Koregon-Bhima वरवरा राव यांच्यावर नानावटीमध्ये होणार उपचार, उच्च न्यायालयाचा दिलासा!

वरवरा राव (संग्रहित छायाचित्र)

कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणात अटकेत असलेले ज्येष्ठ कवी-लेखक वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून वरवरा राव यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर तुरुंगात वरवरा राव यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नी हेमलता राव यांनी केला होता. त्यासाठी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेऊन आज उच्च न्यायालयाने वरवरा राव यांना दिलासा दिला आहे. आता पुढचे १५ दिवस त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार होणार आहेत. मात्र, ही परवानगी देताना नानावटीतून न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना डिस्चार्ज घेता येणार नाही, अशी अट देखील न्यायालयाने घातली आहे. गेल्या २ वर्षांपासून अर्थात २०१८पासून वरवरा राव तळोजा जेलमध्ये असून एनआयएच्या कस्टडीमध्ये आहेत.

वरवरा राव गेल्या काही दिवसांपासून आजारी असून बेड रिडन अवस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं आवश्यक असल्याची बाजू हेमलता यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयात मांडली. त्यांना इतरही शारिरीक त्रास असून यामध्ये जर त्यांचा कारागृहात मृत्यू ओढवला, तर कोठडीत मृत्यू झाल्यामुळे नवीन केस तयार होईल, असा दावा वरवरा राव यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. मात्र, एनआयएने वरवरा राव यांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचं सांगत हा दावा नाकारला.