सेलिब्रिटी, नेत्यांना सहज मिळणारा ICU बेड सामान्य जनतेला का मिळत नाही?; वडिलांना गमावलेल्या तरुणीचा सवाल

icu beds

राज्यातील आरोग्य विभागाची व्यवस्था खिळखिळी झाली असून गेले काही दिवस याचं स्पष्ट चित्र समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत आयसीयू बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. खिळखिळ्या झालेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे जन्मदात्या वडिलांना गमावलेल्या तरुणीने राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवरुन सरकारला प्रश्न विचारले आहेत. तरुणीने व्हिडीओ शेअर करत राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे. रश्मी पवार असं या तरुणीचं नाव आहे.

रश्मीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. तिच्या वडिलांना वेळेवर बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार मिळावे यासाठीही वणवण करावी लागली मात्र उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जन्मदात्या वडिलांना गमावलेल्या रश्मीने राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच ICU बेड्स कसे उपलब्ध होतात असा संतत्प सवाल तिने विचारला आहे. सामान्य जनतेला आयसीयू बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन मिळत नाहीत. मात्र, श्रीमंतांना, सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच सर्व सुविधा, ICU बेड कसे मिळतात? असा सवाल तिने केला आहे. यानंतर अनेकांनी तिची साथ देत प्रशासनाला सवाल केले आहेत.

गेले काही दिवस राज्यातली आरोग्य व्यवस्था किती दुर्बल आहे याचं चित्र समोर आलं आहे. औरंगाबादमध्येही वाळूज परिसरात रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यामुळे एका महिलेला चक्क रस्त्यावर झाडाखील ऑक्सिजन लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कोविड सेंटरमध्ये ४० बेड उपलब्ध असतानाही महिलेला बेड देण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे. महिलेची प्रकृती ढासाळत होती. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली जात होती. तोपर्यंत झाडाखालीच ऑक्सिजन लावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या घटनेनंतर आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता.