पाली-खोपोली मार्गावरील जांभुळपाडा पूल धोकादायक

एमएमआरडीएचे दुर्लक्ष

Mumbai
Pali-Khopoli Road

वाहनांची कायम वर्दळ असलेल्या पाली-खोपोली मार्गावरील जांभुळपाडा पूल अतिशय धोकादायक अवस्थेत असल्याने अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तळकोकणाकडे जा-ये करणार्‍या प्रवाशांना अतिशय सोयीच्या झालेल्या या मार्गावरील हा पूल आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांनी उपोषणही केले आहे.

दिवसभरात या पुलावरून हलकी व अवजड अशी शेकडो वाहने जा-ये करतात. हा पूल 64 वर्षांपूर्वी दगडांचा वापर करून बांधला असल्याने वरकरणी तो मजबूत वाटत असला तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. पूल आतून पूर्ण पोखरला असून, प्लास्टर आतील बाजूने गळून पडले आहे. दगडी खांबदेखील कमकुवत झाले आहेत. त्यामुळे कधीही हा पूल कोसळण्याची शक्यता आहे.

स्थानिक जनतेच्या रेट्यानंतर एमएमआरडीएने दुरुस्तीचे काम हाती घेतले, पण तेव्हा पुलाच्या वरील बाजूला प्लास्टर करण्यात आले. पुलाचे नऊ खांब मात्र अद्यापही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. याचा परिणाम पुलाचे खांब कमकुवत होण्यात झाला असून पुलावरून एखादे वाहन गेले की काळजाचा थरकाप उडविणारे हादरे त्या ठिकाणी जाणवतात. महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच महत्त्वाच्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. परंतु आता नादुरुस्त आणि धोकादायक झालेल्या पुलांकडे एखादी दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष जाणार का, असा सवाल स्थानिक जनता करीत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here