घरमहाराष्ट्र‘लावा रे तो व्हिडीओ’ची तयारी सहा महिन्यांपूर्वीची

‘लावा रे तो व्हिडीओ’ची तयारी सहा महिन्यांपूर्वीची

Subscribe

लावा रे तो व्हिडीओ …या राज ठाकरेंच्या शब्दांनी सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु, हे व्हिडीओ लावणारे पडद्यामागील सूत्रधार कोण याचे उत्तर सर्वच शोधत होते. परंतु आता हे कोडे आता उलगडले आहे. राज यांच्या या संकल्पनेसाठी मनसेचे नेते अनिल शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण तीन जणांची टीम काम करीत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडीओ निर्मितीचा प्रवास गेल्या सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाला असल्याची माहिती ‘आपलं महानगर’च्या हाती आली आहे. यासाठी मनसेचे सोशल नेटवर्किंगचे काम पाहणार्‍या टीमला याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

या व्हिडीओसाठी मुंबई कार्यालयातून देखील काम केले जाते. यासाठी मोदींच्या विविध भाषणांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर त्याचे महत्व लक्षात घेऊन हे व्हिडीओ चालविले जातात. सध्या या व्हिडीओची प्रचंड चलती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह अनेक माध्यमांचे प्रतिनिधी, मनसैनिक आणि इतर सामान्य नागरिकांकडूनही मनसेला अनेक व्हिडीओ पुरविले जात असल्याची माहिती मनसेच्या एका बड्या नेत्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मनसेच्या प्रत्येक बड्या नेत्यांकडे तसेच लहान कार्यकर्त्यांकडे दिवसाला १५ ते २० व्हिडीओ येत असून हे व्हिडीओ सोशल नेटवर्किंग सांभाळणार्‍या टीमच्या स्कॅनरखाली असतात. हे व्हिडीओ लावतो कोण याचे उत्तर देखील यावेळी समोर आले असून सुजीत गिरकर हा तरुण हे व्हिडीओ लोकांच्या समोर आणत आहे. हे व्हिडीओ तयार करण्यामध्ये देखील सुजीत गिरकर आणि त्याच्या टीमची महत्वाची भूमिका आहे.

क्रम पूर्वनियोजित नसतो

- Advertisement -

या व्हिडीआेंची पूर्ण माहिती राज ठाकरेंना देण्यात येतेे. त्यानुसार राज ठाकरे हे आपल्या भाषणांत त्याचा उल्लेख करतात. त्यानंतर व्हिडीओ लावला जातो. मुळात कोणता व्हिडीओ कधी लावायचा याचा क्रम वगैरे पूर्वनियोजित नसतो. राज ठाकरेंचे भाषण सुरू झाल्यानंतर त्यासंदर्भातील कोणता व्हिडीओ या टीमकडे आहे. त्यानुसार ही टीम या व्हिडीओ ‘क्यू ’करुन ठेवते आणि मग लावा रे तो व्हिडीओचे राजफर्मान आल्यानंतर तो चालविला जातो .

राजकीय पक्ष देखील व्हीडिओचे पुरवठादार

अनेक राजकीय पक्षांचे नेते देखील सध्या अशाप्रकारचे व्हीडिओ मनसेच्या नेत्यांकडे पाठवित असल्याची माहिती एका मनसेच्या नेत्याने खासगीत बोलताना दिली. ज्यात प्रामुख्याने अमित शहा विरोधक, समाजवादी पक्ष, शिवसेना आणि इतर नागरिक विचारवंत देखील हे व्हिडीओ पाठवतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -