घरमहाराष्ट्रपायाभूत सुविधा प्रकल्प 'ब्रेक'लेस - उद्धव ठाकरे

पायाभूत सुविधा प्रकल्प ‘ब्रेक’लेस – उद्धव ठाकरे

Subscribe

कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यासारख्या विभागाकडून सादरीकरण करण्यात आले. तब्बल चार तास नॉन स्टॉप ही आढावा बैठक सुरू होती. कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली नाही. तसेच बुलेट ट्रेनबाबतचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विकास कामे पूर्ण करताना प्राधान्य क्रम ठरवावा. सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले.

बुलेट ट्रेनबाबत कोणताही निर्णय नाही

पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. पण आरे कारशेडच्या मुद्द्यावर याआधीच दोन दिवसांपूर्वी काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील कोणत्याही विकास प्रकल्पांना स्थगिती देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या बैठकीमध्ये राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा सूर होता. तसेच नव्या सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा आवश्यक निधीही पुरवण्यात येईल, असे सांगण्यात आले. आजच्या बैठकीत मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गरज लागली तर सरकार मदत करणार अशी भूमिका घेतली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. राज्य सरकार कोणताही पायाभूत सुविधा प्रकल्प बंद करणार नाही, तर नागरिकांसाठी लवकरात लवकर या प्रकल्पांची पुर्तता व्हावी यासाठीचे प्रयत्न होतील, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर बरच चित्र स्पष्ट झाले

राज्य सरकार हे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सकारात्मक आहे. माध्यमांमध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी येणाऱ्या बातम्या या चुकीच्या असून आजची बैठक अतिशय सकारात्मक झाली. राज्य सरकार पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सकारात्मक आहे हेच आजच्या बैठकीतून जाणवले, अशी माहिती एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने दिली. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये राज्यातील बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग तसेच मेट्रो प्रकल्पाला ब्रेक लागण्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. पण आजच्या बैठकीनंतर बरच चित्र स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे सरकार देणार फडणवीसांना दणका, प्रकल्पांबद्दल घेणार मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -