घरमहाराष्ट्रसुसज्ज हॉस्पिटल नसल्यामुळे रायगडमध्ये मरण झाले स्वस्त

सुसज्ज हॉस्पिटल नसल्यामुळे रायगडमध्ये मरण झाले स्वस्त

Subscribe

 माणगाव सिलिंडर स्फोट

जिल्ह्यातील माणगाव येथे शुक्रवारी घडलेल्या सिलिंडर स्फोटाच्या भीषण दुर्घटनेनंतर मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल व्हावे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुकांतून मतदारांच्या तोंडावर आश्वासनांची धुळफेक करणारे लोकप्रतिनिधी वारंवार विविध दुर्घटना घडूनही हॉस्पिटलबाबत खरोखर गंभीर आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

क्रिप्टझो कंपनीतील दुर्घटनेनंतर १८ जखमींपैकी ५ जणांना तातडीने मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोघांना काही वेळातच जीव गमवावा लागला. कदाचित त्यांना वेळेत चांगले उपचार मिळाले असते तर ते वाचूही शकले असते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक गुंतवणूक रायगडमध्ये असली तरी तेथे दुर्घटना घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी रस्ता पकडावा लागतो तो पनवेल, नवी मुंंबई किंवा थेट मुंबईचा.

- Advertisement -

जिल्ह्यातून खोपोली-वाकण नवीन महामार्गासह चार राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग जातो. या ठिकाणी वाहन अपघातांची संख्या लक्षणीय असून, अपघात झाल्यानंतर रुग्णांना उपचारासाठी खासगी महागड्या किंवा मुंबई-पुण्यातील सरकारी, महापालिकांच्या हॉस्पिटलांमध्ये हलवावे लागते. ५ नोव्हेंबर 1990 साली नागोठणे येथील तत्कालीन आयपीसीएल (आताची रिलायन्स) कारखान्यातील स्फोटात ३८ पेक्षा अधिकांचा बळी गेला. त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जिल्ह्यातील कारखानदारांसह दानशुरांच्या अनेक बैठका घेतल्या. दुर्दैवाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे वडखळ येथे मोफत जागा मिळत असताना रुग्णालय उभे राहू शकले नाही. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहे आणि दापोली (जि. रत्नागिरी) येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे आश्वासन दिले गेले. पण पुढे त्यावर कुणी अवाक्षरही काढलेले नाही.

जिल्ह्यात मोठमोठे कारखाने असल्याने त्यांच्या सहभागातूनच सुसज्ज हॉस्पिटल होऊ शकते. मात्र त्यात पुढाकार घेणारे जाणकार पाहिजेत, अन्यथा रुग्णालया संदर्भातील बैठकीत कारखान्यांतून निघणार्‍या ठेक्यांची चर्चा होण्याची जास्त शक्यता आहे. आजमितीला काही कारखान्यांचे मोठाले दवाखाने असले तरी तातडीच्या उपचारासाठी ते बिनकामाचे ठरतात. उपचारा अभावी किड्या मुंगीसारखे जाणारे जीव वाचवायचे असतील तर सुसज्ज हॉस्पिटलसाठी पाठपुरावा गरजेचा आहे. नव्याने निवडून आलेले खासदार, आमदार यांनी यासाठी सरकारकडे जोरकसपणे पाठपुरावा करावा लागेल.

सुसज्ज हॉस्पिटल नसल्यामुळे रायगडमध्ये मरण झाले स्वस्त
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -