जुळे जन्मले, मात्र कोरोनाने केले पोरके

जन्मदात्रीचा काही तासांतच मृत्यू; नगर जिल्ह्यात आणखी ९ नवे रुग्ण, संगमनेरातील दोघांचा तर अकोल्यात आणखी एकाचा समावेश

Nashik
Gave birth to twins, but orphans due to corona
Gave birth to twins, but orphans due to corona

नगरच्या शासकीय रुग्णालयात गुरुवारी एका कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्यांना जन्म दिला होता. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला असून मुलांसह मातेची तब्येत ठिक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते. याला काही तास उलटत नाही तोच शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास या मातेचा मृत्यू झाला. याशिवाय जिल्ह्यात नव्याने आणखी ९ कोरानाबाधित सकाळच्या अहवालात आढळले आहेत. यात एका चार वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

नव्याने आलेल्या अहवालामध्ये संगमनेरच्या मदिनानगरमधील एक पुरुष आणि एक महिला कोरोनाबाधित आढळले आहेत. तर अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आणखी एक रुग्ण आढळला आहे. पिंपळगावमध्ये आढळलेल्या बाधिताच्या संपर्कातील हा रुग्ण आहे. याशिवाय ठाणे येथून पारनेरमधील हिवरे कोरडा, चाकण (पुणे) येथून ढोर जळगावमध्ये (शेवगाव) आलेल्या प्रत्येकी एकेकासह राहाता तालुक्यातील चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. निमगाव येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील हे चार जण असून यात बापलेकीचा समावेश आहे. पिंपळगाव खांड (अकोले) येथे आलेली महिला ही यापुर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे.

जिल्हा रुग्णालयात गुरुवारी एका कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्यांना जन्म दिला होता. या महिलेचे सिझर करण्यात आले होते. महिलेला प्रसुतीनंतर आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. बाधित महिलेला न्युमॅटिक लक्षणे जाणवत होती. ही महिला मुंबईतून निंबळक येथे आलेली होती. तिच्या दोन्ही बाळांची तब्येत ठिक असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापुसाहेब गाढे यांनी दिली.