अंजनेरीच्या प्रस्तावित रस्त्याला आदित्य ठाकरेंचा ब्रेक

पर्यावरणस्नेही संघटनांकडून विरोध झाल्यानंतर स्वागतार्ह निर्णय

मुळेगाव ते अंजनेरी मार्गावर प्रस्तावित १४ किलोमीटर रस्त्याला पर्यावरणस्नेही संघटनांकडून विरोध झाल्यानंतर पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावित रस्त्याला ब्रेक दिला आहे.

या मार्गामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येणार असल्याने हा रस्ता रद्द करण्याची मागणी पर्यावरणीय संघटनांनी केली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी पर्वत पर्यावरण आणि धार्मिक दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या माथ्यावर वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती, तसेच लुप्त होत चालेला लाल चोचीच्या गिधाडांची सातशेहून अधिक घरटी आहेत. येथे जवळजवळ १०५ प्रकारच्या पक्षांची नोंद वनविभागाकडे आहे. लाल चोचीच्या गिधाडांच्या अधिवासासाठी अंजनेरी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा मार्ग झाल्यास निसर्गाच्या जैविक साखळीला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होईल. या पर्वताला २०१७ मध्ये राखीव वनसंवर्धना क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे अंजनेरी संरक्षित बांधकाम क्षेत्रात बांधकाम करण्याचा प्रयत्न शासनाच्या धोरणाविरुद्ध आहे. हा प्रस्तावित मार्गही रद्द करावा, अशी मागणी या पर्यावरणप्रेमींनी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिकमधील पर्यावरणस्नेही संघटनांनी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर शिटटी बजाओ, शासन, प्रशासन जगाओ आंदोलनही केले. त्यानंतर दोनच दिवसांत आदित्य ठाकरे यांनी असे टिवट केल्याने पर्यावरणप्रेमी, साहसी पर्यटन करणरया संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यावरण संस्था, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक, ग्रीव्ह फाउंडेशन, इको एको फाउंण्डेशन, नाशिक पक्षीमित्र मंडळ, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, अंजनेरी ग्रामस्थ, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच इ. संस्थांनी या रस्त्याला विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

महाविकास आघाडी सरकार हे शाश्वत विकासासाठी वचनबध्द आहे. फार पूर्वीपासून विचाराधीन हा रस्ता यापुढेही होणार नाही. पर्यावरणाचा र्‍हाय होऊ नये आणि हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरीचे पावित्र्य व जैवविविधता अबाधित राहावी, हाच आमचा मानस आहे.