घरमहाराष्ट्रनाशिकभ्रष्टाचारामुळे भुजबळ तुरुंगात

भ्रष्टाचारामुळे भुजबळ तुरुंगात

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांवर केली घणाघाती टीका

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन तुरुंगात गेल्याच्या अविर्भावात नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काही बहुरुपी बोलत असतात. वास्तविक, त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगाची हवा खावी लागली. मोदींच्या नेतृत्वात भ्रष्टाचार्‍यांची जागा तुरुंगातच आहे. त्यामुळे अशा बहुरुप्यांनी आम्हाला शिकवू नये. त्यांनी कोठे कोठे डल्ले मारले आहेत, ते जनतेलाही ठाऊक आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांवर केली. पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मोदीजी तुमची हवा इतकी जोरात वाहतेय की, जे कधीही डगमगत नव्हते. तेदेखील डगमगायला लागले आहेत, असे सांगत फडणवीस म्हणाले, जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवारांचे आता मोठेच हाल आहेत. त्यांचे वक्तव्य बघितले, तर त्यांची सदसदविवेक बुद्धीही त्यांच्याबरोबर नाही, अशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या प्रारंभी राष्ट्रवादीचा कर्णधार मैदानात उतरला. पॅड बांधले, ग्लोव्हज, हेल्मेट घातले. शतक मारतो, असे सांगितले. पण मोदींनी अशी गुगली टाकली की हा कर्णधार प्रथमत: पव्हेलियनमध्ये गेला आणि बारावा खेळाडू झाला. मोदींच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात अनेक कामे झाले आहेत. कादा प्रश्नाला अनुदान देणारे हे सरकार आहे. प्रथमच रेल्वे मंत्रालयाने कांद्याकरता कोल्ड स्टोअरेजची, अतिरिक्त गाळ्यांची निर्मिती केली. या शिवाय पंतप्रधानांनी निर्यात शुल्क समाप्त केले. त्याला प्रोत्साहन भत्ता दिला. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍याला थेट मदतीच्या माध्यमातून २ हजार २८ कोटी रुपये दिले. नाशिकमध्ये आठ हजार शेततळी तयार केली. ६४८ गावांत जलयुक्त शिवारची कामे झाली आहेत. ३२ हजार शेतकर्‍यांना ठिबक सिंचनासाठी निधी दिला. ३५ हजार गरीबांना पंतप्रधान आवास योजनेत घरे दिलीत. ५० हजार लोकांना अजून घरे देणार आहोत. रस्त्यांसाठी साडेतीन हजार कोटी रुपये दिले. मुद्रा योजनेतून ४ लाख लोकांना कर्ज दिले. नाशिक शहर आणि ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन चालले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

- Advertisement -

नारपारसाठी १० हजार ८०० कोटींच्या आराखड्याला मान्यता दिली आहे. जुन्या सरकारने करार करून गुजरातला पाणी दिले. मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा करार मोडून दिलेले पाणी परत आणले. हे सगळे पाणी १७ धरणांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला आणि विशेषत: ग्रामीण भागाला मिळणार आहे. यासाठी मोदींनी दहा हजार ८०० कोटी रुपये आराखड्याला मान्यता दिली आहे. लवकरच याची सुरुवात होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उवाच

  • शरद पवारांची सदसदविवेकबुद्धीही सध्या त्यांच्यासोबत नाही
  • आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांच्या जागा मोदी सरकार काढणार असल्याचा विरोधकांकडून कांगावा
  • भारत हा अमेरिका आणि इस्त्रायलनंतरचा एकमेव असा देश आहे की, सैनिकाला कोणी हात लावला तर घरात घुसून मारतो
  • पाकिस्तान असो वा चीन, मोदींनी ठणकावून सांगितले आहे की, आमच्या अंगावर आला तर ठोकल्याशिवाय राहणार नाही.
  • पाकिस्तानी आतंकवाद्यांना मदत करणार्‍या भारतातील राजकीय पक्षांची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -