पाठिंब्यावरून मराठा संघटनांमध्ये वाद

नाशिक शहरातील पाच मराठा संघटनांनी रविवारी (ता. १४) युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यापैकी तीन संघटनांनी त्यास विरोध केल्यामुळे मराठा संघटनांमध्ये नवा वाद उफाळून आला आहे.

Nashik
मराठा संघटनेच्या बैठकीत सहभागी पदाधिकारी.

नाशिक शहरातील पाच मराठा संघटनांनी रविवारी (ता. १४) युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यापैकी तीन संघटनांनी त्यास विरोध केल्यामुळे मराठा संघटनांमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. मराठा समाजाने कोणत्याही उमेदवारास अधिकृत पाठिंबा दिला नसल्याचे सांगत या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (ता. १५) तातडीने बैठक घेत त्याचा निषेध नोंदवला आहे.

मराठा मंगल कार्यालयात सोमवारी मराठा सेवा संघ, छत्रपती सेना, मावळा संघटना, छावा मराठा संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. युतीच्या काळात सकल मराठा बहुजन समाजाने 58 मूक मोर्चे काढले व 42 मराठा बांधवानी बलिदान दिले. अनेक तरुणांनांवर गुन्हे दाखल झाले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मिळणारे कर्ज हे मराठा समजाच्या तरुणांना भूलथापा ठरले. पंजाबराव देशमुख वसतीगृहमध्ये देखील अद्याप सुविधा उपलब्ध नाहीत. या शासनाच्या काळात हजारो शेतकरी बांधवानी आत्महत्या केल्या. असे असताना युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे सकल बहुजन मराठा समाजाची फसवणूकच असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही राजकीय अथवा प्रादेशिक पक्षाला आमचा पाठिंबा नाही. याविषयी येत्या दोन दिवसांत सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्याम जाधव, किरण पानकर,योगेश कापसे, नितीन रोटे पाटील, गोपाल मेमाणे, तुषार गवळी, ज्ञानेश्वर कवडे, विक्रम गायधनी, संदीप शितोळे, मदन गाडे, सत्यजित खुटवड, कैलास कासार, संदीप निगळ, जितेंद्र चव्हाण, सुशील काकडे, हार्दिक निगळ, चेतन शेलार, नीलेश शेलार, अण्णासाहेब खाडे, प्रफुल्ल वाघ, उमेश मते, मधुकर खोड उपस्थित होते.

दोन दिवसांत भूमिका जाहीर करेल

संभाजी ब्रिगेडने कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. हा काही लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी असलेला केवीलवाणा प्रयत्न आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य व जिल्हा कार्यकरणीशी चर्चा करून संभाजी ब्रिगेड येत्या दोन दिवसांत भूमिका जाहीर करेल. – प्रफुल्ल वाघ, शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

कोणत्याही राजकीय पक्षास पाठिंबा नाही

युतीच्या काळात मराठा समाजाच्या कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाही. उलट युवकांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे युतीला पाठिंबा देणे हे मावळा संघटनेच्या विचारांना अनुसरून नाही. मावळा संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षास पाठिंबा नाही. – श्याम जाधव, जिल्हाध्यक्ष, मावळा संघटना.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here