घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादी-मनसे मनोमिलनाची ‘डेट’ निष्फळ

राष्ट्रवादी-मनसे मनोमिलनाची ‘डेट’ निष्फळ

Subscribe

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या गृहभेटी घेऊन मनोमिलनाचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, ही भूमिका जाहीर करण्याबाबत पदाधिकारीही संभ्रमात असल्याने शनिवारी, २३ मार्चला राजगडावर झालेली बैठकही निष्फळ ठरली.

नाशिक नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचा पण केला असला तरीही पाठींबा कोणाला द्यायचा याबाबत त्यांनी जाहीरपणे भूमिका स्पष्ट केलेली नाही. असे असले तरीही राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या गृहभेटी घेऊन मनोमिलनाचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, ही भूमिका जाहीर करण्याबाबत पदाधिकारीही संभ्रमात असल्याने शनिवारी, २३ मार्चला राजगडावर झालेली बैठकही निष्फळ ठरली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तसेच महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. भुजबळांच्या गळ्यातील मफलर आवळा यापासून सुरु झालेले हे वाकयुध्द बाळासाहेबांना अटक करणार्‍यांशी चर्चा कसली करताय, टोलमधून पैसे खाल्लेले गब्बर हे आणि यासारखे अनेक आरोप करीत राज ठाकरे यांनी भुजबळांवांवर हल्लाबोल केला होता. तर भुजबळांनीही त्यास प्रत्युत्तर देत माझा रमेश किणी होईल की काय याची भीती वाटते, असे सांगत किणी प्रकरण उकरुन काढले होते. असे असले तरीही पाच वर्षात संपूर्ण वातावरण बदलले आहे. गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची बाजू जाहीरपणे मांडणार्‍या राज यांनी यंदा मोदी विरोधी भूमिका घेतली आहे. काही दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. मात्र आघाडीला पाठींबा देण्याविषयी त्यांनी मौन धारण केले. असे असले तरीही मनसेच्या काही पदाधिकार्‍यांनी आघाडीच्या उमेदवारांबरोबर चर्चा सुरु केली आहे. विशेष म्हणजे भुजबळ कुटूंबियांकडून संबंधित पदाधिकार्‍यांच्या गृहभेटी घेतल्या जात आहेत. दरम्यान, शनिवारी राजगडावर बैठकही घेण्यात आली. परंतु वरिष्ठांकडून पाठींब्याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने पदाधिकार्‍यांनी मौन बाळगण्यातच धन्यता मानली. मात्र त्यांच्या अशा भूमिकेमुळे जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

- Advertisement -

भुजबळ काका-पुतण्यांची डॉ. प्रदीप पवारांशी भेट

मनसेच्या झालेल्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब करीत भुजबळ काका-पुतण्याने डॉ. प्रदीप पवार यांची त्यांच्या नवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ आणि डॉ. प्रदीप पवार एकमेकांविरोधात उभे होते.

बातमी मागची बातमी

पुर्व नाशिक मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना आव्हान देण्यासाठी मनसेचे राहुल ढिकले प्रयत्न करीत आहेत. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सहकार्याने मनसे निवडणूक लढविण्याच्या विचारात आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पाठींबा देण्याचा निर्णय राज यांनी घेतल्याचे बोलले जाते. शिवाय गेल्या पंचवार्षिक काळात महापौरपदाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या आदेशावरुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे विरोधकांचे बळ कमी होऊन मनसेच्या अ‍ॅड. यतीन वाघ आणि त्यानंतर अशोक मुर्तडक यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. या उपकाराची परतफेड करण्याची संधी लोकसभेच्या रुपाने मनसेला चालून आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -