शहरात ५ दिवस पॅराग्लायडर, ड्रोन, हेलिकॉप्टरला बंदी

पंतप्रधान व मुख्यमंत्री दौरा; पोलीस प्रशासन सतर्क

Nashik
प्रातिनिधीक फोटो

नाशिक : काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी गुरुवारी (दि.१९) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. तर, बुधवारी मुख्यमंत्र्यांचा रोड शो असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी २० सप्टेंबरपर्यंत खासगी हेलिकॉप्टर्स, ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स उडवण्यावर बंदी घातली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात १६ सप्टेंबरपासून व्हीआयपी, व्ही.व्ही.आय.पी. दर्जाच्या राजकीय व्यक्तींचे दौरे आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व उपाययोजनांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. शहर गुन्हे विशेष शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत कलम १४४ लागू केले आहे. दौर्‍यादरम्यान कोणताही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्वप्रकारच्या हवाई साधनांना पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी असेल. ही बंदी शनिवारी (दि.१४) रात्री ९ वाजेपासून ते शुक्रवारी (दि.२०) रात्री १२ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे पॅराग्लायडर्स, पॅरामोटर, हँगग्लायडर, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून्स, खासगी हेलिकॉप्टर, ड्रोन यांसारख्या विविध हवाई साधने उडवता येणार नाहीत.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार

व्हीआयपी, व्ही.व्ही.आय.पी. दर्जाच्या राजकीय व्यक्तींच्या थांबण्याच्या ठिकाणांना संवेदनशील परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष दर्जाच्या व्यक्तींच्या हेलिपॅडची जागा, रस्ता परिसरात कोणत्याही प्रकारच्या हवाई साधनांचा वापर करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
– लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त

अशी घ्या परवानगी

ड्रोनव्दारे अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौर्‍याचे हवाई चित्रीकरण करायचे असल्यास अशा व्यक्ती, संस्था, शासकीय आस्थापनांना पोलीस ठाणे निहाय वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवानगी ड्रोनव्दारे चित्रीकरण केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here