लोकमान्यता आहेच, आता राजमान्यता हवी…

‘आपलं महानगर’च्या राउंड टेबल चर्चासत्रात खासगी क्लासेसचालकांनी व्यक्त केली गरज

Nashik
Private Classes

कोचिंग क्लासेस नियंत्रण व नियमन कायद्यासाठी स्थापित समितीत प्रथमच शासकीय अधिकार्‍यांसह चार तज्ज्ञ शिक्षकांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच लोकमान्यता असलेल्या खासगी कलासेसचालकांना आता राजमान्यताही प्राप्त होईल. एकीकडे शाळा-कॉलेजांत व्यवस्थित अध्यापण होत नसल्याने पालक खासगी क्लासेसवर अवलंबून असतात. तेव्हा खासगी क्लासेस शिक्षक हा अध्यापक या संज्ञेत बसायलाच हवा. या घटकाने त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपली संघटना स्थापन करून समर्थपणे अस्तित्व उभे केले आहे. मात्र त्यांचे अनेक प्रश्न आजही दुर्लक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी क्लासेसचालकांच्या काही पदाधिकार्‍यांनी ‘आपलं महानगर’ने आयोजित केलेल्या राउंड टेबल चर्चासत्रात या व्यवसायास आता राजमान्यता मिळण्याची गरज अधोरेखित केली. या चर्चेतील हा गोषवारा…

कायदा मंजूर करावा

कोचिंग क्लासेस नियंत्रण व नियमन कायदा शासन करणार आहे. त्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत प्रथमच शासकीय अधिकार्‍यांबरोबरच क्लासेसच्या क्षेत्रातील चार तज्ज्ञ शिक्षकांनाही घेण्यात आले आहे. हा कायदा योग्य त्या अटी शर्ती घेऊन त्वरीत मंजूर करावा. ज्यामुळे क्लासची शासनाकडे नोंदणी होवून क्लासेस या व्यवसायास राजमान्यता मिळेल आणि दुहेरी शिक्षक व वाढत्या स्पर्धेला आपोआप आळा बसेल. – प्रा.जयंत मुळे, अध्यक्ष, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संघटना.

इंटिग्रेटेड क्लासेस बंद करा

मोठ्या व लहान शहरांमध्ये अकारावी, बारावी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेताना असे समजते, की अनेक महाविद्यालयांनी क्लासेसशी टाय-अप केला आहे. म्हणजे विद्यार्थी क्लासला प्रवेश घ्यायला गेला की त्याला व त्याच्या पालकांना सांगून एका विशिष्ट कॉलेजलाच प्रवेश घेण्याचा आग्रह धरला जातो. प्रवेश घेतल्यानंतर फक्त प्रॅक्टीकलसाठी जायचे बाकी पूर्णवेळ त्याने क्लासलाच बसावे. हे करताना निवास व कोचिंगच्या नावाखाली पालकांना लाखो रुपयांना गंडवले जाते. याबाबत शासनाने त्वरीत लक्ष घालून अशा कॉलेजवर कारवाई करण्याबरोबरच पालकांचेही प्रबोधन करावे. आमची संघटना अशा गोष्टींना अजिबात पाठीशी घालत नाही. – प्रा. शिवाजीराव कांडेकर, माजी राज्याध्यक्ष, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संघटना.

शिक्षकांचे खासगी क्लासेस बंद करा

शासकीय नियमानुसार अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळा कॉलेजमध्ये सर्विसला असलेल्या शिक्षकांना खासगी क्लासेस घेता येत नाही; परंतु, अनेक असे शिक्षक आज सर्रास क्लासेस घेतात. इतरांच्या क्लासेसमध्ये शिकवतात. काही महाभाग पत्नीच्या नावे स्वत: क्लासेस चालवतात. हे करताना शाळेत किंवा कॉलेजमध्ये मुलांना धमकी देतात की, तू माझ्या क्लासला आला नाही तर प्रॅक्टीकलचे किंवा तोंडी परीक्षेचे गुण देणार नाही किंवा विशिष्ट क्लाससाठी आग्रह धरला जातो. याविषयी पुराव्यासह अनेकवेळा तक्रारी करुन सुध्दा शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालकांकडून ठोस कारवाई होत नाही. म्हणून अशा शिक्षकांचे फावते यावर कडक कारवाई व्हायला हवी. – प्रा. अण्णासाहेब नरुटे, उपाध्यक्ष, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संघटना.

क्लासेसच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार हवा

क्लासेस हा शिक्षणव्यवस्थेचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. विविध परीक्षांमध्ये उत्तूंग यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या यशात क्लासेसचा मोठा वाटा असतो. मग या क्षेत्राला त्यांच्या विविध समस्या मांडण्यासाठी विधानसभेत किंवा विधानपरिषदेत योग्य प्रतिनिधित्व तर मिळायलाच हवे. याशिवाय शाळा, कॉलेजच्या शिक्षकांप्रमाणे खासगी क्लासेस शिक्षकांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अढिधिकार निवडणूक आयोगाने दिला पाहिजे. – प्रा. लोकेश पारख, सचिव, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संघटना.

परिषद स्थापण्यास परवानगी द्या

देशात काही खासगी व्यावसायिकांच्या परिषद केंद्र (कौन्सिल सेंटर) आहेत. त्याव्दारे वकील, डॉक्टर यांना मार्गदर्शन केले जाते. विशिष्ट पदवी मिळवल्यानंतर हे लोक संबंधित कौन्सिलकडे नोंदणी करुन त्यांचा व्यवसाय करतात. त्यावर काही प्रमाणात त्या परिषदेचे नियंत्रण असते. मात्र, क्लासेसच्या बाबतीत तसे होत नाही. पात्रता नसताना काही लोक क्लासेस सुरु करतात. यामुळे अनेक वाममार्गाचे व अनियमितपणाचे क्लासेस हे केंद्र ठरु लागले आहे. घराघरात क्लासेस निर्माण होवून तीव्र स्पर्धा निर्माण झाल्याने गुणवत्तेबाबत पालकांचे व विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे. याला उपाय म्हणून पीटीए या राज्यस्तरीय संस्थेला परिषद स्थापन करण्याची परवानगी दिल्यास ती संस्था सर्व बाबी तपासून क्लासेस कोणी सुरू करावेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच काय निकष असावेत, याची नियमावली करुन शासनास वेळोवेळी अहवाल देईल. – प्रा. अतुल आचलिया, खजिनदार, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संघटना.

मनपाने क्लासेस शिक्षकांना पुरस्कार द्यावे

राज्यात, शहरात तसेच गावागावात देखील क्लासेसचे शिक्षक अत्यंत मेहनतीने विद्यार्थ्यांना ज्ञानाजर्नाचे कार्य करतात. सुसंस्कृत व सक्षम पिढी घडवून समाजोन्नतीचे काम हे देशउभारणीचे कार्य असते. उद्योजक, डॉक्टर, अभियंता, शेतकरी आदींसह शाळा, कॉलेजसह शिक्षकांनासुध्दा शासन पुरस्कार देते. मग या क्लासेस चालक शिक्षकांना शासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध स्तरावर पुरस्कार द्यावेत. जेणेकरुन त्यांच्या कार्याचा गौरव होईल. याशिवाय पुढे अधिक चांगले काम करण्यास त्यांच्यासह पुढील पिढीला प्रेरणा मिळेल. – प्रा. वाल्मिक सानप, सरचिटणीस, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संघटना.

शासनाने मदत करावी

क्लासेसचे संचालक जेवढे कष्ट घेतात त्याचा विचार केला तर त्यांना परिवारासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षकांना शासनाने मदत केली पाहिजे. – कैलास देसले, कार्याध्यक्ष, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संघटना.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here