घरमहाराष्ट्रनाशिकअपक्षांना बदलायचेय राजकारण

अपक्षांना बदलायचेय राजकारण

Subscribe

केवळ हौसेखातरच नव्हे बदल घडवण्यासाठी ११ उमेदवार रिंगणात

‘कोण म्हणतं उमेदवारीसाठी पक्षच हवा? भारतीय राज्यघटनेने कुणाही जागरूक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. सर्व प्रस्थापित पक्षांनी जनतेचा अपेक्षाभंगच केला आहे. निकालानंतर काय होईल याचा आम्ही विचार करीत नाही. मात्र, आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय. भ्रष्ट लोकप्रतिनिधींनी लोकांचा विश्वासघात केला आहे. आम्हाला राजकारणाचं हे चित्र बदलवायचं आहे. हे उद्गार आहेत नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या अपक्ष उमेदवारांचे. होय. त्यांच्याही ठाम भूमिका आहेत. त्यांचेही प्रचारात ठोस मुद्दे आहेत. प्रत्येक जण ते घेऊन हिरीरीने प्रचारात उतरला आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात प्रमुख चार उमेदवारांमध्येच लढत असल्याचे चित्र माध्यमांमधून समोर येत आहे. युती आणि आघाडीचे उमेदवार ठळकपणे लोकांसमोर येतांना दिसत आहेत. अपक्ष म्हटल्यावर राजकारणात प्रस्थापित असलेल्या माणिकराव कोकाटेंभोवतीच चर्चा फिरत आहे. मात्र, कोकाटेंच्या शिवाय अजून ११ उमेदवार अपक्ष म्हणून पूर्णतयारीने रिंगणात उतरून नशीब अजमावत आहेत.

- Advertisement -

यात काही हौस म्हणूनही राजकीय आखाड्यात उतरले आहेत, तर व्यावसायिक, उद्योजक, उच्चशिक्षित निवृत्त अधिकार्‍यांनाही अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला आहे. त्यांना मिळालेल्या चिन्हांचा ते प्रचारात खुबीने वापर करून मतदारांकडे जात आहेत. सर्वांकडेच चारचाकी वाहने आणि कार्यकर्त्यांची गर्दी नाही. काही उमेदवार स्वत:च एकटे दुचाकीला बॅनर लावून मतदारसंघ पालथा घालीत आहेत. अपक्ष म्हणून का लढत आहात, या प्रश्नावर ‘आम्हीच काय कुणीही जागरूक नागरिक उभा राहू शकतो. तो घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे, असे उत्तर मिळते. भ्रष्टाचार ही आपल्या देशापुढील मोठी समस्या बनली आहे. मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा देशातील भ्रष्टाचार संपवेल. जनतेचा पैसा खाणार्‍या आमदार, खासदारांना जरब बसेल, अशी व्यवस्था निर्माण करेल, अशी भाबडी भूमिकाही काही उमेदवारांनी व्यक्त केली.

चांगल्या लोकांनी राजकारणात यावे

राजकारणाचा स्तर घसरला आहे. अशिक्षित, धनाढ्य तसेच गुंड लोकांच्या ताब्यात राजकारण गेलं आहे. अशी फक्त टीका करीत सामान्य नागरिक राजकारणापासून दूर राहतो. लोकशाहीत जागरूक नागरिक हा केंद्रस्थानी असतो. केवळ टीका करण्यापेक्षा आपणच व्यवस्थेचा भाग व्हावा यासाठी उमेदवारी करणे गरजेचं आहे. नाशिकचा विचार करता बेरोजगारी हा सगळ्यात मुख्य मुद्दा आहे. त्यासाठी मोठा कारखाना आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मोठा कारखाना आला तर शंभर लघुउद्योग वाढतील. लाखो लोकांना रोजगार मिळेल. – सुधीर देशमुख, अपक्ष उमेदवार

- Advertisement -

अपक्ष उमेदवारांचे मुद्दे

  • भ्रष्टाचार हटवणार
  • रोजगार निर्मिती करणार
  • नोटबंदीची चौकशी करणार
  • पुलवामा हल्याची चौकशी करणार
  • मोठे प्रकल्प आणणार

प्रकाश कनोजे यांना करायचाय देश ‘स्वच्छ’

छोटी स्कुटी, तिला मागील बाजूस लावलेले व्यंगचित्रांचे पोस्टर, त्यावर देशभक्ती गीत आळवणारा स्पिकर..पिशवीत लाल, पिवळ्या, हिरव्या रंगांच्या कागदांनी गच्च भरलेली जाहिरनाम्यांची नायलॉनची पिशवी..हा सगळा थाट आहे नाशिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रकाश गिरीधर कनोजे यांचा. त्यांची निशाणी फुगा असल्याने गाडी भोवतीही फुगे लावलेले आहेत.

दहीपुलावरील नेहरू चौकात अनेक पिढ्यांपासून त्यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. आताही बायको दिवसभर लॉन्ड्री व्यवसाय सांभाळते व त्याच उत्पन्नावर कनोजे नाशिक लोकसभा मतदार संघात सकाळपासून रात्रीपर्यंत केवळ एका स्कुटीवर फिरत प्रचार करीत आहेत. भेटणार्‍या प्रत्येक नागरिकाला हात जोडून ‘एकवेळ मला मत देऊ नका, पण मी दिलेला जाहीरनामा नीट वाचा. विचार करा. असे आर्जव करताना दिसतात. त्यांच्या मते आपल्या देशापुढे भ्रष्टाचार हाच प्रमुख मुद्दा आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्व प्रथम ते भ्रष्टाचारी पुढार्‍यांची धुलाई करणार असल्याचे ते सांगतात. त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी शेतमाल हमीभाव, रोजगारी, शाळा डिजिटलायजेशन, राजकीय प्रशिक्षण शिबिरे या मुद्यांचा समावेश आहे. बायकोच्या कष्टावर आपण निवडणूक लढवत असल्याची बोच त्यांच्या मनाला आहे. मात्र, आपले विचार फार मजबूत आहेत. त्या जोरावर लोक आपल्याला साथ देतील. अशा आशावाद प्रकाश कनोजे यांच्या बोलण्यातून व्यक्त होतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -