Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र मेनरोडवर गोंधळ घालणारी म्हैस हरवली; शोधासाठी पोलिसांची धावपळ

मेनरोडवर गोंधळ घालणारी म्हैस हरवली; शोधासाठी पोलिसांची धावपळ

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कोथरुडमध्ये रानटी गवा शिरल्याची घटना ताजी असतानाच नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरात मंगळवारी (दि.१२) दुपारी ३ वाजेदरम्यान भरगर्दीत रस्ता चुकलेली म्हैस शिरली. गर्दीमुळे बिथरलेली म्हैस सुटकेसाठी इकडे तिकडे पळू लागली. त्यात विक्रेत्यांसह चार ग्राहकही जखमी झाले. विशेष म्हणजे, अनोळखी चार व्यक्तींनी ही म्हैस पळवून नेल्याचं समजताच पालिकेच्या मोकाट जनावरे पकडणार्‍या पथकासह भद्रकाली पोलिसांची पळापळ सुरु झाली. सायंकाळपर्यंत पोलिसांनी तीन व्यक्तींना ताब्यात घेत चौकशी केली. मात्र, पोलिसांना म्हैस काही सापडली नाही.

दहीपूल, मेनरोड परिसरात मंगळवारी दुपारी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यावेळी दहीपूलजवळ रस्ता चुकलेली म्हैस आली. म्हैस दहीपूलाकडून मेनरोडकडे जात होती. दरम्यान, ग्राहक व वाहनांच्या गर्दी झाल्याने आणि वाट मिळत नसल्याने म्हैस बिथरली. सुटकेसाठी म्हैस सैरावैरा पळू लागली. यावेळी म्हशीने एका महिलेला शिगेने उचलून फेकले. रस्त्याच्या कडेला सौदर्य प्रसाधनांची विक्री करणार्‍या २५ वर्षीय तरुणाला म्हशीने जखमी केले. त्यानंतर एका कपड्याच्या दुकानात म्हशीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानात चार महिला होत्या. अचानक दुकानात धष्टपुष्ट म्हैस आल्याने त्या भयभीत झाल्या. त्यांनी आरडाओरड सुरू केली. बिथरलेल्या म्हशीने दुकानातील काचेचे कपाट फोडले. त्यामुळे दुकानात काचेचे तुकडे सर्वत्र विखुरले गेले होते. भरवस्तीत म्हैस शिरल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली.
म्हशीला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करु लागले. त्यानंतर अनोळखी चार व्यक्ती पिकअप घेवून घटनास्थळी आले. ते म्हशीला घेवून गेले. विशेष म्हणजे, महापालिकेचे मोकाट जनावरे पकडणारे पथक आले. त्यांनी म्हशीबाबत चौकशी केली असता अनोळखी व्यक्तींनी म्हशीला घेवून गेल्याचे समजले. ही बाब भद्रकाली पोलिसांनाही समजली. त्यानंतर महापालिकेचे पथक आणि भद्रकाली पोलिसांनी म्हशीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तत्काळ तीन संशयितांना ताब्यात सायंकाळपर्यंत कसून चौकशी केली. तरीही, म्हशीचा शोध लागला नाही.

सुरक्षितस्थळी गेल्याने जीव वाचला

- Advertisement -

गर्दीमुळे बिथरलेली म्हैस अंगावर धावून आल्याने भयभीत झालो होतो. म्हैस कपड्याच्या दुकानात घुसू लागली. तिला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात म्हशीने पाठ व उजव्या पायावर शिंगेने हुंदडले. त्यातून पाठीवर जखमी झाली. दुकानात घुसत म्हशीने काचा फोडल्या. सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न केल्याने जीव वाचला.
फारुक सय्यद, प्रत्यक्षदर्शी

- Advertisement -