‘निसर्ग’ चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा : नाशिक जिल्हयात बत्ती गुल

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू

nashik
महावितरण

 

जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला नाशिकसह पुणे, कल्याण, रत्नागिरी व राज्यातील अनेक भागात मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू करण्यात आले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज सध्याच घेता येणार नाही. निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळेसुद्धा ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वार्‍यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. वादळी वार्‍यासह सुरू असलेल्या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात व शहरात ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. तसेच अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे चक्रीवादळ राज्यात दोन दिवस घोंघवत असून या वादळाचा सामना करण्यास वीज कंपन्या सज्ज आहेत. या वादळाच्या अनुषंगाने एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संचालक दर्जाचे अधिकारी नोडल अधिकारी या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे असे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

वादळामुळे जिल्हयात महावितरणची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हळुहळु सर्व संपुर्ण शहराचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. याकाळात नागरीकांनी सहकार्य करावे. वादळाच्या तीव्रतेवर होणारे नुकसान अवलंबुन असणार आहे. त्यानूसार विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. अती उच्च दाब वाहिन्या सर्वप्रथम सुरू केल्या जातील. त्यानंतर उपकेंद्र सुरू केली जातील. त्यानंतर टप्प्या टप्प्याने उच्च दाब वाहिन्या व लघुदाब वाहीन्या सुरू केल्या जातील. नागरीकांनी या काळात सहकार्य करावे.
प्रवीण दरोली, अधिक्षक अभियंता, महावितरण, नाशिक