शिवसैनिकांनो, विचारपूर्वक निर्णय घ्या

शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांचे बंडखोरांना आवाहन, कार्यकर्त्यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही

NASHIK
Nilam_Gorhe

युती झाल्यामुळे प्रामुख्याने शहरी भागात शिवसेनेला कमी जागा मिळाल्याने अनेक ठिकाणी उमेदवार, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मात्र शिवसेना प्रमुखांनी सांगितलेला शब्द आहे, ‘मनात वादळ असले तरी, निर्णय विचारपूर्वक घ्या’ तसेच सच्चा शिवसैनिकांना माघार घ्या, असे सांगण्याची गरज कधी भासत नाही. असे सांगत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज्यभरात बंडाळी पुकारलेल्या शिवसैनिकांना माघार घेण्याचे आवाहन केले.

नाशिक दौर्‍यावर आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, राज्यात पुणे, नाशिक, नागपूर अशा अनेक शहरात शिवसेनेला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. तरीदेखील शिवसैनिक योग्य विचार करतील. नाशिक शहरात जरी अधिक जागा नसतील, तरी ग्रामीणमध्ये अधिक आहेत. कार्यकर्त्यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. त्यांनी काम करण्याची तयारी ठेवावी, असेही त्या म्हणाल्या. राज्यात शिवसेनेला ६३ जागा आहेत. तरीदेखील आपण १२४ जागांवर लढत आहोत. कामावर विश्वास आहे; त्यामुळेच हे शक्य झाले आहे. आज भाजपचे राज्यात १२३ आमदार आहेत. परंतु युतीसाठी त्यांनीही नरमाईची भूमिका घेऊन १४६ जागांवर समाधान मानून युती करून आगामी निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट जागा मिळत आहेत. यावरून शिवसेनेच्या आमदारांच्या कामावरचा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. हजारो कार्यकर्त्यांचे जीवन या निवडणुकांशी जोडले गेलेले असते. यामुळे इतक्या मोठ्या जागावाटपात दोन चार जागी नाराजी असणे हे वेगळे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. सोमवारी (दि. ७) माघारीचा दिवस आहे. तेव्हा चित्र स्पष्ट होईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. कार्यकर्तेदेखील विचारपूर्वक निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘आरे’तील कत्तल चुकीचीच

कोर्ट ऑर्डर ऑनलाईन न टाकताच एका रात्रीत शेकडो झाडांवर फिरवलेली कुर्‍हाड पूर्णपणे चुकीची आहे. ‘आरे’च्या जंगलतोडीसंदर्भातील याचिका उच्च न्यायलयाने फेटाळली, तर ती सुप्रीम कोर्टात जाईल. तेथील निर्णय यायचा आहे. त्याआधीच जंगल ओसाड केले गेले. याचिकेबाबतचे ऑर्डर ऑनलाईन न येताच एका रात्रीत पोलीस बंदोबस्तात कत्तल म्हणजे अत्यंत चुकीचे आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत रोष व्यक्त करत आरे कॉलनीतील झाडांची कत्तल म्हणजे पाकव्याप्त काश्मीरवरील हल्लाच असल्याचे म्हटले. आरे कॉलनीतील जंगल वाचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा आहे. याला शिवसेनेचा पाठिंबा आहेच. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हा घाला घालण्यात आल्याचे गोर्‍हे म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here