नाशिककरांनो गर्दी करू नका, घरीच बसा; लॉकडाऊनवर पोलिसांची ड्रोन नजर 

कॅमेरे आवाहनासह टिपणार क्षणचित्रे

Nashik
drone

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर 21 दिवसांचा लोकडाऊन सुरू आहे. नाशिक पोलिसांनी नागरिक घराबाहेर पडतायेत का, हे पाहण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. अनेकजण पोलिसांची नजर चुकवून आदेशाचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कमेऱ्याची अनोखी शक्कल वापरली आहे. ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांना घरीच बसा, गर्दी करू नका, असे आवाहन केले जाणार आहे.

शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.27) सकाळी ड्रोन पेट्रोलिंगला गोदाघाटावरून सुरुवात केली आहे. या ड्रोन कमेराद्वारे गर्दी कुठे झाली आहे ते पोलिसांना समजणार आहे. ड्रोनच्या मदतीने नागरिक घरी जाण्यास प्रवृत्त होतील आणि जे घरी जाणार नाहीत त्यांच्यावर ड्रोनच्या शुटिंगवरून पोलीस कारवाई करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर जाणे टाळावे, जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी घरातील एकानेच बाहेर जावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे.

पोलीस ठाणेनिहाय ड्रोन कॅमेरे

शहर पोलिसांना 8 ड्रोन कॅमेरे मिळाले आहेत. गरजेनुसार शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याला एक ड्रोन कॅमेरा देण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेऱ्यानी शहरातील हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात एकूण 86 नाकाबंदी पॉईंट्‌स, 65 बिट मार्शल आणि पोलिसांच्या 16 चारचाकी वाहने कार्यान्वित करण्यात आली आहेत.