घरमहाराष्ट्रनाशिकदत्तक नाशिकमध्ये आज 'राज गर्जना'

दत्तक नाशिकमध्ये आज ‘राज गर्जना’

Subscribe

’लाव रे तो व्हिडीओ’चा भाजप-शिवसेनेने घेतला धसका, शहर विकासाच्या मुद्यावरून घेरणार

राज्यभरात ’लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत आपल्या आक्रमक शैलीत पंतप्रधान मोदी व शहांविरुद्ध रान पेटविणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शुक्रवारी, २६ एप्रिलला शहरातील हुतात्मा कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये ही सभा होणार असल्याने, युतीला चांगलाच घाम फुटला आहे.

राज ठाकरे हे त्यांच्या प्रत्येक प्रचारसभेत मोदी आणि शहांच्या आधीच्या आणि नंतरच्या भाषणाच्या क्लिप्स दाखवत, त्यांचा खोटेपणा उघड्यावर मांडत असल्याने, आघाडीला त्याचा थेट फायदा होणार असल्याचे सांगितले जाते आहे. कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज यांची जाहीर सभा होत असल्याने, सर्वांचेच त्याकडे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या या सभा राज ठाकरे यांचे पुनरागमन मानले जाते आहे. राज ठाकरे यांची सभा ज्या मैदानावर होते आहे, त्याच मैदानावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही कायम असलेले नागरी प्रश्न, थंडावलेला विकास या मुद्द्यांवरून राज ठाकरे सत्ताधार्‍यांना घेरण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सत्ता असताना साकारलेले बोटॅनिकल गार्डन, लिंकरोड, वाहतूक बेटांचा विकास, पूल, गोदापार्क, इतिहास संग्रहालय, होळकर पुलावरील म्युझिकल फाउंटन अशा विविध विकासकामांचाही लेखाजोखा मांडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज यांच्या सभेनंतर दुसर्‍याच दिवशी याच मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यामुळे राज यांचे मुद्दे खोडून काढण्याची संधी मुख्यमंत्र्यांना मिळणार आहे.

या मुद्यांवरुन होणार पंचनामा

  • शहरातील घरपट्टीत केलेली अव्वाच्या सव्वा वाढ
  •  करयोग्य मूल्यातील वाढ
  • स्मार्ट सिटीअंतर्गत अपूर्ण कामे
  • शहर बससेवेचा प्रलंबित प्रश्न
  • हरितक्षेत्र विकास
  • गोदावरी संवर्धन
  • बांधकाम प्रकल्पांची कपाटकोंडी
  • साडेसहा व सात मीटर रस्त्यांजवळील बांधकामांना टीडीआर बंदी
  • खुंटलेला औद्योगिक विकास
  • वाढती बेरोजगारी
  • शेतकरी आत्महत्या
  • शेतीमालाचे कोसळलेले दर
  • शेतकरी आत्महत्या
  • मनसेच्या काळात केलेल्या कामांकडे झालेले दुर्लक्ष
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -