मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत युतीचा आज मनोमिलन मेळावा

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी, १७ मार्चला भाजप-शिवसेना युतीचा आज नाशकात मनोमिलन मेळावा होत आहे.

Nashik
Shivsena_BJP
शिवसेनेचे बुथप्रमुख; भाजपचे पन्नाप्रमुख

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी, १७ मार्चला भाजप-शिवसेना युतीचा आज नाशकात मनोमिलन मेळावा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ३ वाजता जुना गंगापूर नाका येथील चोपडा बँक्वेट हॉल येथे होणार्‍या या मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. सोबतच नाशिक व दिंडोरी येथील युती उमेदवारांची नावेदेखील आज घोषित होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपची युती निश्चित झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी प्रथमच व्यासपीठावर येत आहेत. मनोमिलन मेळाव्यानिमित्त नाशिक लोकसभा मतदारसंघाचे रणशिंग फुंकले जाणार असले तरी महापालिका निवडणुकीत उभयतांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न येथे केला जाऊ शकतो. नाशिक लोकसभा हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे उमेदवारीवरून सेनेत सुरू असलेल्या कुरबुरी मिटवून उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे येथील उमेदवारी नेमकी कोणाला मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आघाडीतर्फे दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांचे नाव निश्चित झाल्यानंतर नाराज झालेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन रविवारी नाशिकमध्ये असल्यामुळे त्यांना पक्षात घेण्याचा विचार होऊ शकतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होऊ देणार नाही, असे सांगत भुजबळांनी इरादे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे आता डॉ. भारती पवार बंडखोरी करणार की भाजपमध्ये प्रवेश करतात, यावर दिंडोरीचे समीकरण ठरणार आहे. डॉ. पवार यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला तर विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नेमकी काय भूमिका घेता यावर दिंडोरी लोकसभा निवडणुकीचे निकाल अवलंबून राहतील. परिणामी, युतीचा मनोमिलन मेळावा हा फक्त शिवसेनेच्या दृष्टीने नव्हे तर भाजपसाठीदेखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

डॉ. भारती पवार यांच्यासाठी प्रवेशद्वार उघडणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे संकटमोचक तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन रविवारी नाशिकमध्ये आहेत. मनोमिलन मेळाव्याच्या निमित्ताने उभयतांमध्ये दिंडोरी लोकसभेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आघाडीतर्फे डावलण्यात आलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची चाल खेळली जाऊ शकते. त्यादृष्टीने रविवारच्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.

अ‍ॅड. कोकाटे व्यासपीठावर येतील का?

नाशिक लोकसभा मतदारसंघात उतरण्यासाठी सिन्नरचे माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सेनेत उमेदवारीवरून कुरघोडी सुरू असताना भाजपमध्ये असलेले अ‍ॅड. कोकाटे यांनी आपली दावेदारी थेट मुख्यमंत्र्यासमोर मांडत तिकीटाची मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करण्याचा निर्धार केलेले अ‍ॅड. कोकाटे युतीच्या व्यासपीठावर दिसणार का? याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here