घरमहाराष्ट्रनाशिकपवारांच्या उपस्थितीत ठरणार रणनिती

पवारांच्या उपस्थितीत ठरणार रणनिती

Subscribe

बुधवार, गुरुवार दोन दिवस नाशिक दौर्‍यावर : सभांचे आयोजन

काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार १० व ११ एप्रिलला नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक रणनिती आखण्यात येणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला कोणताही धोका निर्माण होऊ नये याकरता खुदद शरद पवारांनी लक्ष घातले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नाशिकमधील काही प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक घेत त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आघाडीच्या उमेदवारांमागे उभे राहण्याचे आदेश दिले. यापूर्वी पवार यांनी नाशिकमध्ये येत मेळावाही घेतला. नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समीर भुजबळ, शिवसेनेच्यावतीने हेमंत गोडसे रिंगणात आहेत. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही अपक्ष म्हणून उभे राहण्याची तयारी चालवली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे पवन पवार, मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, माकपतर्फे इरफान शेख उमेदवार आहेत. सध्या बहुरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत गोडसे व भुजबळ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच होईल हे उघड आहे. भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असल्याने त्यांची लढत नेमकी गोडसे या मराठा उमेदवाराशी होत असल्याने मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती आहे. यापूर्वी राष्ट्रवादीतीलच मराठा समाजाच्या नेत्यांनी निवडणुकीत भुजबळांना विरोध केला होता. त्यामुळे भुजबळांचा पराभव झाला होता. मात्र, यंदा अशा कोणत्याही प्रकारचा दगाफटका उमेदवारासोबत होऊ नये याकरता पवार स्वतः रणनिती आखत आहेत.

- Advertisement -

पक्षाने एक एक जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याअनुषंगाने शरद पवार यांचा नाशिक दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. उमेदवारी माघारीच्या एक दिवस अगोदर पवार नाशिकमध्ये येत असल्याने पवार काय रणनिती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -