संग्राम जगतापांची ‘ही’ खेळी सुजय विखेंना तापदायी ठरणार

सरकार विरोधातील शेतकर्‍यांच्या नाराजीने सुजयला फोडला घाम

Nashik
डॉ. सुजय विखे आणि डॉ. सुजय विखे

नगर लोकसभा मतदार संघात भाजपा युतीचे डॉ. सुजय विखे आणि काँग्रेस आघाडीचे संग्राम जगताप यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. नगरच्या १४ पैकी १२ तालुक्यांत भयंकर दुष्काळाने ठाण मांडले असताना एरवी चिडीचूप होणारी ग्रामीण भागातील दुपार लोकसभा निवडणूक प्रचाराच्या उडणार्‍या धुळीने रंगून गेली आहे. सुजय यांचा प्रचारात शहरी भागावर भर असून संग्रामने ग्रामीण भागात भेटीगाठीचा धडाका लावला आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतकर्‍यांची नाराजी यामुळे संग्रामला मिळणार्‍या प्रतिसादाने सुजयला घाम फोडल्याचे चित्र या टप्प्यात तरी स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘शेतकर्‍यांचा रोष’ या निवडणुकीत प्रभावी ठरेल आणि त्याचा संग्राम जगताप यांना लाभ मिळू शकतो, अशीही चर्चा उघडपणे ऐकायला मिळत आहे.

भाजपाकडून विरोधी पक्ष नेत्याच्या मुलाची फोडाफोडी, शरद पवारांचे मतदारसंघाकडे असलेले लक्ष यामुळे नगर मतदार संघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. आघाडीच्या नियोजनात नगरची जागा राष्ट्रवादीकडे जात असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेससाठी जागेचा हट्ट धरला. आघाडीकडून जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असताना लोकसभेसाठी आतूर असलेल्या विखेंच्या पुत्राने भाजपाशी संधान साधले. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीत डॉ. सुजय विखे यांचा वाजत गाजत भाजपा प्रवेश झाला व त्यांना अपेक्षेप्रमाणे तिकीटही मिळाले. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी सभाही झाली. प्रचारात सुजय यांनी मुसंडी मारल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. मोठ्या ताकदीने मैदानात उतरलेल्या सुजयला विजयश्री माळ घालेल का, हा खरा प्रश्न आहे.

हे वाचा – काळ्या कपड्यानंतर मोदींच्या सभेला आता सापांची भीती

प्रतिस्पर्धी संग्राम जगताप यांनी दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागात भेटीगाठीवर जास्त भर दिला आहे. संग्राम यांची रोज सकाळची बैठक कोणत्या तरी तालुक्यातील चारा छावणीमध्ये होत आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील मतदारांचा संग्राम यांच्या भेटीगाठी आणि बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. विखे यांचे पक्षातील विरोधक माजी मंत्री बाळासाहेब थोरात संग्रामसाठी जीवाचे रान करीत आहेत. स्वत: शरद पवार यांनी चारवेळा नगरला येऊन आघाडीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे बळ भरले आहे. त्यामुळे सुजय समोर संग्राम हे एक तगडे आव्हान म्हणून उभे राहिले आहेत. विखे पाटील हे नगरच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या अनुभवाचा पुत्र सुजयला लाभ होऊ शकतो. खूप अगोदरपासूनच सुजय लोकसभेसाठी तयार असल्याने मागील काही वर्षात त्यांचा जनसंपर्कही वाढला आहे. भाजपासारख्या पक्षाची रसद, वडिलांचा राजकारणातील दीर्घ अनुभव या सुजयसाठी जमेच्या बाजू आहेत.

या पार्श्वभूमीवर सुजय आणि संग्राम यांच्यात काट्याचीच टक्कर असून नगर मतदार संघात फार तर दहा वीस हजाराच्या फरकाने हार जितीचे चित्र राहणार असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांमधून वर्तवला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here