मास्कच्या दोरीने गळफास घेणार्‍या कैद्याच्या पोटात सापडली सुसाईड नोट

नाशिकरोड कारागृहातील घटना

मास्कच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करणार्‍या कैद्याचे शवविच्छेदन केले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या शरीरात सुसाईड नोट सापडली. अजगर अली मोहम्मद मुमताज मन्सुरी (३२) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, कारागृह कर्मचार्‍यांच्या वागणुकीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या मुंबईच्या मन्सुरी याने ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मास्कच्या दोरीने गळफास घेतला. ही बाब कारागृहातील पोलीस व वैद्यकीय अधिकार्‍याच्या निदर्शनास आली. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली त्यास मृत घोषित केली. याप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक संपत आडे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शवविच्छेदन दरम्यान डॉक्टरांना त्याच्या पोटात सुसाईड नोट सापडली. याप्रकरणी महाराष्ट्राचे अतिरिक्त डीजीपी (जेल आणि सुधारात्मक सेवा) सुनील रामानंद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.