दुसरीला आणण्यासाठी पहिलीचा छळ

माहेरुन ५ लाख रुपये आणण्यासाठी आणि दुसरीला सून म्हणून नांदवायला आणण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याची घटना चिंचोळे शिवारात घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी घरकुल चिंचोळे शिवार येथील पती किशोर हरिचंद्र साळुंके, सासरे हरिचंद्र साळुंके, सासू कमलबाई साळुंके, दीर किरण साळुंके, नणंद सुरेखा चव्हाण, मिराबाई गोरख दाभादे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरुन ५ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी संगनमत करत १९ मे २०१४ ते २३ जुलै २०२० या कालावधीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्यां मंडळींना सपना नवले नावाच्या महिलेला सून म्हणून आणायचे होते. पती किशोर साळुंके रात्री व अपरात्री सतत सपना नवले हिच्या मोबाईलवर बोलायचा. याप्रकरणी विचारणा केली असता पतीसह सासरी मंडळी तिला शिवीगाळ व मारहाण करायचे. प्रसंगी तिला उपाशीपोटी ठेवायचे. पाच लाख रुपये आण तरच घरात ये, नाहीतर घरात येवू नको, असे तिला सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले. पुढील तपास पोलीस हवालदार भड करत आहेत.