राणा दाम्पत्याला एसटी प्रवास पडणार महागात

मास्क न लावता आणि बसचा दरवाजा उघडा ठेवून प्रवास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या खासदार नवनीत राणा या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीमधून बाहेर पडावां आणि ग्रामीण भागातील सुविधांचा आढवा घ्या. यासाठी बाहेर पडलेल्या राणा दाम्पत्याने मेळघाटातून एसटी बसने प्रवास केला. मात्र, प्रवास करताना एसटीचा दरवाजा उघडा ठेवून तसंच मास्क न वापरता प्रवास केला. यामुळे राणा दाम्पत्याला हा प्रवास महागात पडणार आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघे शुक्रवारी मेळघाटच्या दौऱ्यावर होते. परतीच्या वेळी धारणी ते परतवाडा बसने प्रवास करून प्रवाशांच्या समस्यांचा एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली आहे. राज्यातील काही भागात नवीन बसेस दिल्या जातात. मुंबईत तर वातानुकूलित बसेस धावत आहेत. मेळघाटातील आदिवासींना वीस-वीस वष्रे जुन्या बसगाडय़ा दिल्या जातात. मेळघाटात मात्र वीस-वीस वर्षे जुन्या बसमधून आदिवासींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. धारणीहून अमरावतीला बसने यायला पाच तास लागतात. अनेक बसेसची दारे तुटलेली, खिडक्यांना काच नाही, खडखड आवाज करीत अत्यंत धिम्या गतीने एसटीचा प्रवास सुरू आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. परिवहन मंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला अजूनही वेळ मिळालेला नाही, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

मात्र, हा व्हिडीओ काढताना नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे धावत्या बसचं दार उघडं ठेवून बोलत होते. एक दुचाकीस्वार या व्हिडीओचं चित्रिकरण करत होता. हे सर्व धोकादायक होतं. याशिवाय त्यांनी बसमधून प्रवास करताना मास्कचा वापर केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.