घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीतील धोरणात्मक निर्णय आता पवारांच्याच मर्जीने होणार!

महाविकास आघाडीतील धोरणात्मक निर्णय आता पवारांच्याच मर्जीने होणार!

Subscribe

राज्यात सध्या कोरोनाच्या संकट काळात महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य रंगले असल्याच्या बातम्या येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडी निर्माण झाली ते शरद पवार सध्या कमालीचे नाराज आहेत. आता महाविकास आघाडीमधील सर्व धोरणात्मक निर्णय हे शरद पवार यांच्या मर्जीनेच होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र याचवेळी महाविकास आघाडी स्थापन होण्यामागे शरद पवार यांनी आणि शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याने शरद पवार नाराज झाले असून, महाविकास आघाडीची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. याचमुळे यापुढे महाविकास आघाडीमधील धोरणात्मक निर्णय हे फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या मर्जीने होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

- Advertisement -

शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जे वाद असतील ते समोरा समोर बसवून सोडवा तसेच कोणतेही वाद बाहेर येऊ देऊ नका, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे कळते. दरम्यान काही अधिकाऱ्यांची मनमानी, मंत्र्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, तसेच अजोय मेहता यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधान सल्लागारपदी ठेवल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाराज आहेत. याचमुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत यापूढे तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना विचारात घेऊन निर्णय घ्या असे सांगितल्याचे कळतेय.

महाविकास आघाडी सरकारला धोका नाही

काही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी खासगीत बोलले असता त्यांनी तिन्ही पक्षांमध्ये काही मतभेद जरुर आहेत. काही मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नव्हते, मात्र आता यापुढे असे होणार नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये यापुढे शरद पवार यांना विचारूनच महाविकास आघाडीचे धोरणात्मक निर्णय होतील असे ठरल्याचे एका मंत्र्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. विशेष म्हणजे हे सरकार टिकावे असे खुद्द शरद पवार यांना वाटत असून, ते स्वतः सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत असून, याचमुळे ते वारंवार वाद निर्माण झाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लगेच तोडगा काढतात असे देखील या मंत्र्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -