एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे.

suicide
आत्महत्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होण्याच्या भितीने पोलीस निरीक्षकाच्या दालनातून बाहेर निघताच जंतूनाशक औषध प्राशन करुन या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बुधावारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या तरुणाला देवकर आयुर्वेद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा धोका टळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; यावल तालुक्यातील तरुण आणि तरुणी फैजपूर येथील महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. या काळात विविध शालेय कार्यक्रम, सहली आणि स्पर्धांच्या निमित्ताने सर्वच विद्यार्थींनी एकत्र फोटो काढलेले होते. त्याचवेळी या दोघांची ओळख झाली. दरम्यान, या तरुणीचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला असून ती पतीसह रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत आहे.

लग्न झाल्याचे लागले मनाला

ज्या तरुणीनीवर आपण प्रेम करतो त्या तरुणीचे लग्न झाल्याचे तरुणाला समजले. हीच गोष्ट तरुणाच्या जिव्हारी लागली. त्यानंतर त्या तरुणाने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या पती आणि दिरालाही फोन करुन उलटसुलट माहिती देणे असे उद्योग सुरु केले. तसेच या तरुणासोबत आणखी दोन तरुणांचा देखील सहभाग होता. या तरुणांनी शालेय कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबात वाद झाला. अखेर या तरुणींने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या तरुणासह दोन मित्रांना आणि तरुणीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर या तरुणाची चौकशी करण्यात आली. आता आपल्यावर गुन्हा दाखल होणार आणि आपल्याला जेलची हवा खावी लागणार, या भितीने या तरुणाने खिशातून आणलेल्या जंतुनाशक औषधाचे प्राशन केले. यानंतर त्याला लगेचच उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.


हेही वाचा – सांगलीत कोरोनाबाधित वृद्धेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू