घरमहाराष्ट्रकोविडसाठीच्या सुट्ट्या नियमित करा : शिक्षकांची मागणी

कोविडसाठीच्या सुट्ट्या नियमित करा : शिक्षकांची मागणी

Subscribe

कोरोनाग्रस्त झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना घ्याव्या लागलेल्या सुट्ट्या या आजारपणातील सुट्ट्या न मानता नियमित करण्यात याव्यात असा निर्णय सरकारने घ्यावा

कोरोनाग्रस्त झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना घ्याव्या लागलेल्या सुट्ट्या या आजारपणातील सुट्ट्या न मानता नियमित करण्यात याव्यात असा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे केली आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोनामुळे होणारे संक्रमण हा जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने या विषाणूचे संक्रमण आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक निर्णय घेतले. यामध्ये शिक्षकांना त्यांच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडणे व वरिष्ठांनी बोलल्यानंतर तात्काळ कार्यालयात हजर होण्याचे निर्देश दिले गेले. अनेक शिक्षकांच्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेवा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊन त्यांना उपचारासाठी दवाखान्यांमध्ये दाखल व्हावे लागले. त्याचप्रमाणे कोरोना बधितांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा आजाराची लक्षणे आढळल्यामुळे इन्स्टिट्यूशनल तसेच होम क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्या. कोविड आजाराशी प्रदीर्घ लढा देऊन, या विळख्यातून सुटल्यानंतर शिक्षकांना संसर्ग रोखण्यासाठी तसेच स्वास्थ्य संवर्धनासाठी काही दिवस घरी राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला. अशा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या या कालावधीची गणना कशी करावी या संदर्भात गोंधळाची परिस्थिती राज्यभर दिसून येत आहे. शिक्षकांसाठी मर्यादित असलेल्या वैद्यकीय रजा यावेळी खर्ची घातल्या जात असून तशा प्रकारची मान्यता अनेक महाविद्यालयांमध्ये देण्यात येत आहे. काही ठिकाणी किरकोळ रजा म्हणून गणल्या जात आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता सरकाने यासंदर्भात कोणताही रजेचा अर्ज न घेता हा कालावधी नियमित समजण्यात यावा, असे आदेश देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने केली आहे.

संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित स्वरूपाचा समजण्यात यावा. त्याची गणना रजा काळात करू नये. कर्मचार्‍यांकडून कुठलाही रजेचा अर्ज न घेता हा कालावधी नियमित समजून अशा प्रकारच्या अनुषंगिक नोंदी घेण्यात याव्या.
– प्रा. वैभव नरवडे, महासचिव, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -