खड्ड्यांनी ‘सजलाय’ मुरुडचा रस्ता !

नगर पालिकेचे दुर्लक्ष

Mumbai

शहरातील मुख्य रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याने त्यावरून वाहन चालविणे, तसेच चालणेही कष्टप्रद झाले आहे. गणेशोत्सव आला तरी नगर पालिका प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.बाजारपेठ ते दस्तुरी नाका या मुख्य रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे अतिशय बिकट झाली आहे. येथून वाहनातून, विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणार्‍यांना पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. यात वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेले दहा दिवस पावसाने बर्‍यापैकी विश्रांती घेऊनही पालिका प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. दुसरीकडे राजकीय नेतेही याबाबत आश्चर्यकारकरित्या मूग गिळून गप्प असल्याने या रस्त्याला कोणी वाली राहिलेला नाही.

या रस्त्यावरून वाहन चालविताना चालकांची कसरत पाहण्यासारखी असते. वाहन जात असताना खड्ड्यातील पाणी पादचार्‍यांच्या अंगावर उडत असल्याने अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. नागरिकांचे सोडा, पण शहरात दूरदूरहून येणार्‍या पर्यटकांना खड्ड्यांचे प्रदर्शन नको म्हणून तरी ते बुजवावेत, अशी तिरकस प्रतिक्रिया संतापलेल्या नागरिकांतून उमटत आहे.