घरफिचर्समी घरच निवडेन!

मी घरच निवडेन!

Subscribe

‘काका, मी तर घराला पहिला प्रेफरन्स दिला आहे आणि लेखनाचा नाद मी स्वत:त मुरवून घेतलाय. पण आधी घरच्यांचं बघायचं आणि मग लेखन. अगदीच मला यात कुणी चॉईस विचारला तरी मी घरच निवडेन.’ यावर काका चिडलेच. ‘असं म्हटल्यावर काय बोलायचं आणि वेळ मिळत नसतो. तो काढावाच लागतो. कामं चुकलेली नाहीत पण लेखन हे जर पॅशन असेल तर त्यासाठी कष्ट नको घ्यायला! तुझा नवरा घरकामातसुद्धा मदत करतो मग! हे बघ, तुझ्यामध्ये एक समर्थ कथालेखिका दडली आहे. तिला जोपासायच्या ऐवजी वाया घालवू नये.’

‘मला ना तुम्हा मुलींचं काहीच कळत नाही. संसाराची कारणं देता हे तर बिलकूल पटत नाही. काय तर म्हणे, रविवार आहे. सुट्टीचा दिवस आहे. नवर्‍याला वेळ द्यायचाय. इतर वेळी काय तर मुलाकडं बघायचंय, त्याला वेळ नको का द्यायला. मग काय तर नोकरीतून वेळच मिळत नाही..हीही अशी कारणं देत राहिलात तर लिहिणार कधी?’ ज्येष्ठ संपादक आम्हाला रागवत होते. आम्ही तिघी-चौघी त्यांच्यासमोर बसलो होतो. आमच्यापैकी कुणीही काहीही बोलायच्या आत बाई म्हणजे त्यांच्या सहचरणीनेच त्यांना उत्तर दिलं.

‘पुरुषांना काय जातंय असं म्हणायला.’
‘अरे, आता इथं बाई-पुरुषाचा काय मुद्दा? जिकडून तिकडून स्त्री-पुरुषाची बाब जोडूच नये.’ ते जरा वैतागले.
‘नाही कसा? पुरुषांचं काय! आली उर्मी की लिहीत बसले. दिवसभर काय तेवढंच तर चिंतन करायचं असतंय.’ मग हळूवार होत म्हणाल्या, ‘असतात हो, बायकांचे पाय गुंतलेले. घरची, सासरची मंडळी, संसार, जबाबदार्‍या चुकतात का? करावं लागतं पोरींना. ते एकदम सोडून देता येणार आहे का? तुमच्या बायकोला काही काम नसतं म्हणून या नव्या पोरींना इतर काही उद्योग नाही असं आहे का?’ खरं तर बाई स्वत: लिहित्या हाताच्या आहेत.

- Advertisement -

‘अरे, हो पण मग त्यातून बाहेर कुणी पडायचं? गुंता किती करुन ठेवायचा हे कळायला नको.’ संपादक काका आणि बाई दोघांमध्ये बराच वेळ शाब्दिक चकमकी होत राहिल्या. शेवटी ते दोघं बोलत असतानाच एका मैत्रिणीनं संभाषणात उडी घेतली.

‘काका, मी तर घराला पहिला प्रेफरन्स दिला आहे आणि लेखनाचा नाद मी स्वत:त मुरवून घेतलाय. पण आधी घरच्यांचं बघायचं आणि मग लेखन. अगदीच मला यात कुणी चॉईस विचारला तरी मी घरच निवडेन.’

- Advertisement -

यावर काका चिडलेच. ‘असं म्हटल्यावर काय बोलायचं आणि वेळ मिळत नसतो. तो काढावाच लागतो. कामं चुकलेली नाहीत पण लेखन हे जर पॅशन असेल तर त्यासाठी कष्ट नको घ्यायला! तुझा नवरा घरकामातसुद्धा मदत करतो मग! हे बघ, तुझ्यामध्ये एक समर्थ कथालेखिका दडली आहे. तिला जोपासायच्या ऐवजी वाया घालवू नये.’

काकांंना बायकांच्या अडचणी कळत नव्हत्या अशातला भाग नव्हता, पण त्याचीच ढाल करून त्यामागं स्वत:ला दडवून घेणं त्यांना पटत नव्हतं तर दुसरीकडं बाईदेखील जगाची रीतभात समजावण्याचा प्रयत्न करत असल्या तरी त्यांचं म्हणणं इतकंच होतं की आपण मुलींच्या त्या सभोवतालाचा विचार न करता त्यांना आळशी समजू नये.

हा संपूर्ण संवाद घडत असताना मला तिथं उपस्थित सर्वांच्याच बोलण्यामागचा भाव कळत असला तरी पण काकांचं म्हणणं जास्त पटत होतं. अनेकदा बायका स्वत:हूनच स्वत:ला वेगवेगळ्या गुंत्यात गुंतवून घेतात. मग त्याला घरकामाचं नाव देतात, स्वच्छतेचं, उत्तम गृहिणी आणि उत्तम एम्प्लॉयी होण्याचं, कधी नवर्‍याचं मन राखणं, मुलाबाळांचं संगोपन अशी कित्येक. या थबडग्यात स्वत:ला काय हवंय, काय नकोय, आपल्या क्षमता काय आहेत, आपण कुठवर झेप घेऊ शकतो या सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागतो.

आपल्याला काहीतरी करावंसं वाटणं आणि त्यासाठी वेळ देणं हीच मुळी काही जणींना अपराधाची भावना वाटते. आपण आपल्या आवडीसाठी आपल्या एखाद्या छंदासाठी वेळ कसा काढायचा… असं कसं काय आपण आपल्या मुलाच्या संगोपनातील, गृहकृतदक्षतेतील वेळ द्यायचा…अशा चिंतेनं बायका पोखरुन निघतात. कितीतरी वेळा घरातली इतर मंडळी म्हणतातही, ‘अगं तुला लागेल ती मदत करायला तयार आहे. तुझ्यासोबत आहे.’ तरीही स्त्रियांना तसं वागणं म्हणजे आपण अक्षम्य चूक करतोय असंच वाटत राहतं. एखाद्या दिवशी एखादं काम मागाहून केलं किंवा नाहीच केलं तर असं काय आभाळ कोसळणार असतं. एखाद्या दिवशी घरातल्या वस्तू आपापल्या जागेवर नाही गेल्या किंवा अंथरुणाची घडी घालायच्या ऐवजी नुसतंच बाजूला सारुन ठेवलं, एखाद्या दिवशी साग्रसंगीत स्वयंपाकाच्याऐवजी नुसताच खिचडीभात केला किंवा आपल्या असंख्य कामातल्या काही कामांना एखाद्या दिवशी हातच नाही लावला तर खरंच आभाळ कोसळणार असतं का? अजिबात नसतं पण आपण हे सर्व रोजच्या रोज करण्यासाठी स्वत:ला उगीच बांधून घेतलेलं असतं. त्यापेक्षा आपल्याला सुचणारी कथा, एखादं नक्षीकाम, एखादं लाकूडकाम, एखादी उर्मी वाढवणारी कला-कल्पना, एखाद्या प्रोजेक्टची भन्नाट योजना ही जास्त महत्त्वाची नसते का?

माझी एक मैत्रिण आहे. तिचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी. लहान मुलांसाठी एका संस्थेत काम करते. तिथं प्रोजेक्ट हेड आहे. तिला गाण्यांची, नाचाची, कवितांची, फिरण्याची, लिहिण्याची प्रचंड आवड आहे. याशिवायही तिला अधूनमधून नवनवे छंद गवसत असतात. ती त्यात छान रमते. या सगळ्यामध्ये ‘रोज’ स्वयंपाक करणं ही काय तिला फार शक्य असणारी गोष्ट नाहीये. घरात इनमीन दोन माणसं आहेत. नवर्‍याच्या कंपनीत चहा, नाश्ता, जेवणाची सोय आहे. तिनं देखील एक घरगुती मेस लावलीये. मूड आल्यावर खरोखरच स्वयंपाक करण्याची उर्मी दाटल्यावर आणि स्वयंपाकात काहीतरी प्रयोग करावासा वाटल्यावरच ती तिथं रमणारी आहे. ‘कर्तव्य’ म्हणून किंवा आयुष्याचा ‘भाग’ म्हणून नव्हे. मध्यंतरी एका कामानिमित्ताने तिच्याशी सातत्याने भेटी होत होत्या. दुपारची वेळ असल्यास ती आमच्या डब्यातूनच जेवतही होती. असं सहा-सात दिवस सातत्यानं घडल्यावर एक दिवशी ती म्हणाली, ‘यार, असं वाटतंय मी काहीच करत नाही. तुम्ही लोक इतकं छान छान स्वयंपाक करून आणता आणि मी काय रिकाम्या हातानंच येते.’ एरवी कायमच आपल्या टर्मसवर असणारी तीसुद्धा त्याक्षणी भलेही क्षणभर पण खट्टू झाली होती. तिला आपलं काय जगावेगळं चाललंय असं क्षणभर तरी वाटलंच.

मी सहज म्हटलं तिला, ‘तू कुठं रिकाम्या हातानं येते. सोबत एखादी कविता असते, कथा असते, लहान मुलांसोबताचा अंतुर्मख करणारा अनुभव असतो. डॉक्युमेंटरी विषय असतो, परफॉर्मन्सच्या कल्पना असतात. किती काय काय असतं. ज्यांना हे जमत नाही त्यांच्याविषयी तक्रार नाही, पण ज्यांना जमतं त्यांनी तेच निगुतीनं करावं.’ ती जाम खूश झाली.

आपण उगीच इतरांचं बर्डन घेत राहतो. इतरांकडून उत्तम गृहिणीचं बिरुद मिळावं अशी उगाच अपेक्षा ठेवत असतो. त्यानं साध्य काय होणार असतं? काहीच नाही. आपण स्वत:कडून उगाचच परफेक्शनचा आग्रह धरत राहतो. त्या नादात आपण ज्यासाठी सर्वाधिक वेळ द्यायला हवा ते मात्र सपशेल विसरुन जातो. काका म्हणत होेते ते अगदी खरंच होतं की, वेळ कुठून मिळणार असतो तो काढावाच लागतो. नाहीतर आपणहून स्वत:ला मारण्याची प्रक्रिया सुरू होते. ती थांबवण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -