कंगनानं स्वत:चं ट्विटर हँडल स्वत: वापरावं, राजकीय पक्षांना हाताळायला देऊ नये – संजय राऊत

sanjay raut kangana ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. कंगनाने मुंबईची तुलना POK आणि तालिबानशी केल्यानंतर शिवसेने खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, आज पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना कंगनावर टीकेची तोफ डागली आहे. कंगना राणावतशी वैयक्तिक भांडण नाही. मात्र, कंगनानं स्वत:चं ट्विटर हँडल स्वत: वापरावं, इतर राजकीय पक्षांना हाताळायला देऊ नये, असा टोला लगावला आहे.

यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपने कंगनाच्या वक्तव्याविरोधात भूमिका मांडली. मात्र, भाजपने ही भूमिका आक्रमकपणे मांडायला हवी होती, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईसाठी सर्वपक्षियांनी एकत्र यायला हवं होतं. कंगनाच्या विधानाचं निषेध करणाऱ्यांचं अभिनंदन, असं संजय राऊत म्हणाले. कंगनाने छत्रपतींचा, मराठ्यांचा आणि शिवसेनेचा इतिहास अभ्यासायला हवा, असा सल्ला राऊतांनी कंगनाला दिला. संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.