अभिमानास्पद! जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाची सूत्र मराठी माणसाकडे!

srikant datar named harvard university dean
श्रीकांत दातार

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या विद्यापीठांमध्ये सर्वात वरचा क्रमांक असलेल्या हार्वर्ड विद्यापीठाची (harvard University) सूत्र आता मराठी माणसाच्या हाती येणार आहेत. श्रीकांत दातार असं त्यांचं नाव असून ते १ जानेवारी २०२१ पासून हार्वर्ड विद्यापीठाच्या डीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. भारतीयांसाठी आणि त्यातही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही अभिमानास्पद बाब असून श्रीकांत दातार (Srikant Datar) हे हार्वर्डचे दुसरे भारतीय वंशाचे डीन असतील. त्यांच्या आधी नितीन नोहरिया हे हार्वर्डचे डीन होते. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा हार्वर्ड विद्यापीठाच्या डीनपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसणार आहे. हार्वर्डचे अध्यक्ष लॅरी बॅकोव्ह यांनी ही माहिती दिली आहे. हार्वर्डमध्येच श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक आहेत. या नियुक्तीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीटरवर श्रीकांत दातार यांचं अभिनंदन केलं आहे.

कोण आहेत श्रीकांत दातार?

श्रीकांत दातार यांनी १९७३ साली मुंबई विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटंट झाल्यानंतर अहमदाबादच्या आयआयएममध्ये प्रवेश घेतला. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झाल्यानंतर ते पीएचडीसाठी स्टॅनफोर्डला गेले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी सांख्यिकी-अर्थशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात कामाला सुरुवात केली. गेली अनेक वर्ष श्रीकांत दातार हार्वर्ड विद्यापीठात बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे ते ११वे डीन असणार आहेत.