घरमहाराष्ट्रयंदा राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस

यंदा राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस

Subscribe

यावर्षी राज्च्या सर्वच भागात पाऊस चांगला असूनस जलाशयांमध्ये जवळजवळ ६६ टक्के पाण्याचा साठा निर्माण झाला आहे.

राज्याच्या सर्व भागात यावर्षी पाऊस पोहोचला असून १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या ८६.१ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये ६६.१ टक्के साठा निर्माण झाला असून खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

राज्यातील ११ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस

राज्यात सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या ८६.१ टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास ७४८.९ मि.मी. म्हणजेच ७८.३ टक्के पाऊस झाला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार ११ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे १६ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के यादरम्यान पावसाची नोंद झाली असून त्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झालेल्या ७ जिल्ह्यांमध्ये नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी

राज्यात ऊस वगळता इतर खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून ३१ ऑगस्ट २०१८ अखेर २३५.९० लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली आहे. ज्यात ३२ लाख ७१ हजार १०५ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्ये, २० लाख ५२ हजार ६४१ हेक्टरवर कडधान्य आणि ४१ लाख ६४ हजार ४४४ हेक्टरवर तेलबिया पिकाची प्रत्यक्ष पेरणी-लागवड करण्यात आली आहे. तसेच ४१ लाख २ हजार २०७ हेक्टरवर कापूस आणि १ लाख ७२ हजार ३३३ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे.

जलाशयांमध्ये ६६ टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा

राज्यातील जलाशयात ४ सप्टेंबर २०१८ अखेर ६६.१ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ६४.६५ टक्के साठा होता. यावर्षी आणि गेल्या वर्षीचा तुलनात्मक पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात ९३.७ टक्के इतका उपलब्ध आहे. तसेच पुणे विभागात ८७.२८ टक्के, नाशिक विभागात ६३.२१ टक्के,अमरावती विभागात ५४ टक्के,नागपूर विभागात ४८ टक्के आणि मराठवाडा विभागात २९.२१ टक्के इतका साठा उपलब्ध आहे.

- Advertisement -

राज्यात ३११ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा

राज्यात २७ ऑगस्ट २०१८ अखेर एकूण ३११ टँकर्सद्वारे ३०९ गावे आणि ३२२ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १४९ गावांना १५८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील १८ गावे आणि ३ वाड्यांसाठी २४ टँकर्सचा पुरवठा करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -