खासगी कोचिंग क्लासेस चालकांवर उपासमारीची वेळ

राज्य सरकारने तातडीने क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन ऍण्ड सोशल फोरमचे राज्याध्यक्ष प्रा.बंडोपंत भुयार यांनी केली आहे.

कोरोनाचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील लहान व मध्यम कोचिंग क्लासेस सहा महिन्यांपासून बंद आहेत. राज्य सरकारने क्लासेस सुरू करण्यास अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातील जवळपास एक लाखापेक्षा जास्त क्लासेस आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहेत. क्लासेसमधील शिक्षक व अन्य कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय असे जवळपास पाच लाख सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन ऍण्ड सोशल फोरमचे राज्याध्यक्ष प्रा.बंडोपंत भुयार यांनी केली आहे.

राज्य सरकार लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथील करत आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांना सुट देण्यात आली आहे. परंतु शाळा व महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. यामुळे राज्यातील खासगी क्लासेस चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. क्लासेसना परवानगी देण्यात येत नसल्याने सरकारची शिक्षणाच्या बाबतीत अनास्था असल्याचे दिसत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांना ऑफलाईन शिक्षणाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन सरकारने काही अटी घालून खासगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भुयार यांनी केली.
पालकांच्या परवानगीने व विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार फिजिकल डिस्टंसिगचे सर्व नियम पाळून कमीत कमी विद्यार्थी संख्येसाठी किंवा एका बेंचवर एक विद्यार्थी बसण्यास सरकारने परवनागी देत, क्लासेस सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.