दोन मोठ्या तोफा भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार

Mumbai
Howitzer

देशाच्या सीमारेषेवरील वाढती आव्हाने पाहता भारतीय लष्कराकडून आपले सामर्थ्य वाढवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. नाशिकमधील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र देवळाली येथे एम ७७७ अल्ट्रालाईट होवित्झर आणि के.९ वज्र या दोन नव्या अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या तोफा भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीत तोफखाना केंद्राला तोफांचे हस्तांतरण केले जाणार आहे.

या सोहळ्यासाठी देवळाली तोफखाना केंद्र सज्ज झाला असून लष्करी थाटात जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिसरात चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. याठिकाणी निर्मला सीतारामन सोबत लष्करप्रमुख बिपीन रावत,केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे आगमन झाले आहे. यावेळी चार शक्तिशाली तोफांचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले.

यावेळी तोफेने १७.४ किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य अवघ्या ४ सेकंदात भेदण्यात आले. तर २७ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य १३ सेकंदात भेदण्यात आले. तिसर्‍या तोफेने ३८ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अवघ्या १२ सेकंदात भेदण्यात आले. तर १५५ मिलिमीटर पॉवर बोफोर्स तोफेने १४ सेकंदात ३८ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदले. दक्षिण कोरियाकडून घेतलेल्या वज्र तोफेने अवघ्या ९ सेकंदात लक्ष्यभेद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here