घरताज्या घडामोडीचप्पल शिवता शिवता झाली 'बॅग बिजनेस वुमन'

चप्पल शिवता शिवता झाली ‘बॅग बिजनेस वुमन’

Subscribe

२००८ पासून मी बॅग बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मी जेवणाच्या डब्याची बॅग बनवली आणि त्यानंतर सुरु झाली भ्रमंती.

वयाच्या १६ व्या वर्षी मी अकरावीमध्ये शिकत होते आणि त्या दरम्यानच माझ्या वडिलांनी माझ्यासाठी चांगले स्थळ आणले. माझं माहेर तालुका जुन्नर आळेफाटा याठिकाणी गाव राजुरी. तर सासर टाकळी हाजी, तालुका शिरुरमधल. खरं सांगायच तर माझा होणारा नवरा हा आत्याचा मुलगाचं. त्याच्यासोबतच माझं लग्न ठरवण्यात आलं आणि माझं लग्न झाल. असं बघायला गेलं तर माझ्या सासरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे माहेरचा पारंपारिक व्यवसाय घेऊनच मी सासरी आले. खरं तर मला चप्पल शिवायला माझ्या वडिलांनी शिकवले आणि त्याचा फायदा मला सासरी आल्यावर झाला. परंतु, सुरुवातीची ७ वर्षे कर्जात गेली. त्यातच नवऱ्याला ब्रेन ट्युमर या कर्करोगाने ग्रासले आणि मार्च २००७ साली नवऱ्याचे छत्र हरपले आणि त्यादिवसापासूनच माझी आयुष्याची खरी परिक्षा सुरु झाली. एक एक दिवस नकोसा होऊ लागला. त्यातच माझ्या आईचे देखील निधन झाले. हे संकट दूर होत नाही. तर आमचे जुलै महिन्यात मातीचे घर अचानक कोसळे. आणि खायचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाले. एका वेळचा घास देखील मिळणे अशक्य झाले, अशी परिस्थिती आमच्यावर आली. त्यानंतर गावातील लोकांनी निधी गोळा करुन समाजमंदिरात राहण्याची सोय करुन दिली. नंतर कसेबसे करुन तात्पुरते छप्पर उभे राहिले.

Handmade bag
महिला उद्योजिकेने तयार केलेली बॅग

सुरुवातीचे काही दिवस मी माझी दोन मुलं, सासू – सासरे आणि दिर – वहिनी असा कुटुंब परिवारांनी समाजमंदिरात राहून दिवस काढले. त्याच ठिकाणी चप्पला बनवून आम्ही व्यवसाय करत होतो. फार हालाकीची परिस्थिती होती. दरम्यान, गावात अचानक एके दिवशी ग्रामपंचायतीमध्ये चर्मकार समाजासाठी ‘राजश्री शाहू योजना’ आली. या योजनेअंतर्गत शासनाकडून बॅग बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे मला कळले. तसेच या योजनेमध्ये १५०० रुपयाचे विद्या वेतन मिळणार होते. खरं तर यामध्ये भाग घेण्याचा उद्देश वेगळा होता. यामध्ये मिळणाऱ्या पैशातून आम्ही आमचे कपडे आणि गाठोडी ठेवण्यासाठी कपाट खरेदी करणार होतो. मग झालं असं की, आमच्या ३५ स्त्रियांमध्ये या प्रशिक्षणातील शिक्षिका अनिता मगर यांना मी तयार केलेली बॅग फार आवडली आणि त्यांना माझी संपूर्ण परिस्थिती कळली. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, ‘अरुणा आता रडत नाही बसायच तर लढायच’ आणि त्यानंतर त्यांनी मला या व्यवसायात करीअर करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर मी झपाट्याने बॅग बनवण्याचे धाडस केले. २००८ पासून मी बॅग बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मी जेवणाच्या डब्याची बॅग बनवली आणि त्यानंतर सुरु झाली भ्रमंती. नगर – पुणे रोडवरील दुकानांमध्ये, दारोदारी, बाजारापेठामध्ये जाऊन बॅग तुमच्या दुकानात ठेवा. खूप छान दिसतं आहे, असे बोलून त्यांना गळ घालायचो. यामध्ये दीर संपत यांची मला चांगली साथ मिळाली. पाहता पाहता महिलांच्या खांद्यावर, हातात मी तयार केलेल्या बॅगा दिसू लागल्या. सुरुवातीला ९०० रुपये मिळाले आणि हळूहळू व्यवसायात जम बसू लागला. त्यानंतर २०१० साली पुण्यात भीमथडी जत्रा भरणार असल्याचे मला कळले. मात्र, त्या जत्रेत स्टॉल लावण्यासाठी माझ्याकडे बचतगट नव्हता. त्यामुळे मैत्रिणीच्या बचत गटातून मी मोफत स्टॉल लावला. या जत्रेत दोन दिवसात माझ्या ३० हजारच्या सर्व बॅगा संपल्या. मग दोन दिवस थांबून काय करणार?, असा प्रश्न मला पडला आणि मी माझ्या गावाला निघाली. त्यानंतर संयोजकांनी मला थांबालया सांगितलं आणि शेवटच्या दिवशी माझ्या बॅगेला पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या काही होलसेल व्यापाऱ्यांनी माझ्याकडे मोठ्या ऑरडरीही दिल्या आणि त्यानंतर ‘विघ्नहर्ता वेलवेट बॅग’ हाऊस नावारुपाला आले. त्यामुळे एक मुलगी, आई, पत्ती आणि कुटुंबाला सांभाळणारी सून म्हणून आज माझा माझ्या कुटुंबाला अभिमान आहे.

- Advertisement -

वयाच्या २८ वर्षी विधवा झालेली चर्मकार समाजातील अरुणा जाधव काळ्याकुट्ट अंधारात चाचपडत होती. मात्र, या अंधारात शासनाने दिलेल्या प्रशिक्षणानंतर आता ती ‘विघ्नहर्ता वेलवेट बॅग’ची उद्योजिका झाली.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -