घरमुंबईएकाच आठवड्यात १८५० कोटींच्या कामांना मंजुरी

एकाच आठवड्यात १८५० कोटींच्या कामांना मंजुरी

Subscribe

महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना

निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू होण्याची शक्यता असल्याने विकासकामांच्या मंजुरीचा सपाटाच महापालिकेच्या स्थायी समितीने लावला आहे. ‘न भूतो न भविष्यती’ अशा एकाच आठवड्यात समितीच्या तीन बैठका घेत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिकेत इतिहासच रचला आहे. एकाच बैठकीच्या नावाखाली तीन सभा बोलावून स्थायी समितीत तब्बल १३६ प्रस्ताव मंजूर करत त्यांनी सुमारे १८५० कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा केला आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्यास अडचणी येतात. त्यामुळे खात्यांमध्ये आणि अधिकार्‍यांच्या टेबलावर लालफितीत अडकलेले विकास कामांचे प्रस्ताव समितीपुढे सादर करून मंजूर केले जात आहेत. मागील मंगळवारी ५ मार्च रोजी स्थायी समितीच्या बोलावलेल्या सभेत विषय पत्रिकेवर ३० विषय होते. त्याच सभेत ३२ जादा विषय पटलावर ठेवण्यात आले. ही बैठकच तहकूब करून शुक्रवारी ८ मार्च दुसरी तहकूब सभा बोलावण्यात आली. या सभेच्या पटलावर ६६ जादा विषय ठेवण्यात आले. त्यानंतर ५ मार्चच्या सभेच्या अनुषंगाने पुन्हा शनिवारी तिसरी तहकूब सभा बोलावण्यात आली. त्यामध्ये ८ जादा विषय पटलावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे एकाच सभेच्या नावाखाली दोन अतिरिक्त तहकूब सभा बोलावून तब्बल १३६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. स्थायी समितीची आठवड्याला एक सभा बंधनकारक आहे. तहकूब सभा कितीही घेता येऊ शकतात. आजवर तहकूब सभेसह आठवड्यात दोन सभा झालेल्या आहेत. परंतु एकाच आठवड्यात तहकूबसभेसह तीन सभा घेण्याची ही पहिलीच घटना असल्याचे आजी तसेच निवृत्त अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. या तिन्ही सभांमध्ये मिळून १८५० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

- Advertisement -

आचारसंहितेमुळे कोणतीही विकासकामे रखडू नये. जनतेची विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी या सभा बोलावून त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केले. नगरसेवकांच्या सूचनेनुसारच हे प्रस्ताव समितीत मांडून मंजूर केले आहेत. त्यामुळे आचारसंहितेमुळे ही विकासकामे न रखडता त्यांची कामे वेगाने सुरु होतील,असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला.

मूळ सभेसह दोन तहकूब सभेतील एकूण विषय : १३६
मंजूर केलेल्या कंत्राट कामांची रक्कम : १८५० कोटी रुपये

- Advertisement -

मंजूर करण्यात आलेली महत्वाची मोठी विकासकामे

गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयाच्या आवारात इमारत : ४४० कोटी रुपये
एमएसडीपी २ अंतर्गत सर्व मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी सल्लागार सेवा: १४४ कोटी रुपये
नवीन वर्सोवा उदंचन केेंद्रापर्यंत भूमिगत मलजल वाहक बोगदा : १२५.७८ कोटी रुपये
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडचे डांबरीकरण(के/पूर्व विभाग) :८२.३१ कोटी रुपये
एम/पूर्व विभागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण : ६४.४० कोटी रुपये
के/पूर्व विभागातील मोठे रस्ते व पॅसेजेसचे काँक्रिटीकरण :४२.८२ कोटी रुपये
एल विभागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण : ४६.९१ कोटी रुपये
कांदिवली साईनगर पॉवेल लॅड सी व डी इमारतीवर वाढीव मजले : ४६ कोटी रुपये
कांदिवली पश्चिम शालेय इमारतीचे बांधकाम :३४.५९ कोटी
आर/दक्षिण मधील लहान रस्त्यांची सुधारणा : ३३.५५ कोटी रुपये
आर/दक्षिणमधील चौक व मोठ्या रस्त्यांची सुधारणा : ३१.७१ कोटी रुपये
के/पश्चिम रिलिफ मार्ग येथील प्रतीक्षा नगर महापालिका शाळेचे बांधकाम : ३०.३८ कोटी रुपये
पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यातील गाळ काढणे : ३२ कोटी रुपये
गोरेगावमधील नोकरदार महिलांसाठी बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम : २८.४१ कोटी रुपये
मुंबई मलनि:सारण प्रकल्प दोन सल्लागार सेवा (भांडुप): २७.९२ कोटी रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -