महावितरणचा ५६ हजार कोटींचा थकबाकीचा डोंगर

महावितरण

संपूर्ण राज्यात विजेचे महाकाय असे नेटवर्क असणार्‍या महावितरणची विजेची थकबाकी आता ५६ हजार कोटी रूपयांवर पोहचली आहे. उद्योग आणि कृषीपंप ग्राहकांचीच थकबाकी सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. वर्षानुवर्षे थकबाकीचा डोंगर हा साचतच असल्याचे चित्र महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

महाविरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे आगामी पाच वर्षांसाठी बहुवार्षिक वीज दरवाढ याचिका सादर केली आहे. याचिकेत थकबाकी आणि वसुली कार्यक्षमतेची आकडेवारीही महावितरणने मांडली आहे. उद्योगांची वसुली १०० टक्के असली तरीही गेल्या काही वर्षांत उद्योगांची थकबाकी ही ३११२ कोटी रूपयांवर पोहचली आहे.

तर लघुदाब कृषी ग्राहकांकडून ३३ हजार ५९५ कोटी रूपये इतकी थकबाकी आहे. घरगुती वीज ग्राहकांची थकबाकी २३०० कोटी रूपयांवर पोहचली आहे. तर वाणिज्यिक ग्राहकांची कोटी २ हजार कोटी रूपये इतकी साचली आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांची थकबाकीही ६ हजार ६०० कोटी रूपयांवर पोहचली आहे.

लघुदाब वीज ग्राहकांची थकबाकी अधिक

महावितरणच्या उच्चदाब वीज ग्राहकांपेक्षा लघुदाब वीज ग्राहकांची थकबाकी ही अधिक आहे. उच्चदाब वीज ग्राहकांची थकबाकी ही ७५०० कोटी रूपये आहे, तर लघुदाब वीज ग्राहकांची थकबाकी ही ४८ हजार ४५० कोटी रूपयांवर पोहचली आहे. महावितरणने अनेक ग्राहक श्रेणीसाठी वीज ग्राहकांमार्फतची वीज बिलाची वसुली कार्यक्षमता ९० टक्के पेक्षा असल्याचा दावा केला आहे. पण थकबाकी वसुलीचा वाढता डोंगर नियंत्रित करण्यासाठी मात्र महावितरणला गेल्या काही वर्षात अपयशच आले आहे.