अंबरनाथच्या जागेसाठी भाजप आग्रही; किणीकरांच्या कार्यपद्धतीवर नाराज

शिवसेना-भाजपचे नेते जागावाटपावर चर्चा करत असतानाच अंबरनाथमधील कार्यकर्त्यांनी ही जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी केली आहे.

Ambarnath
ambarnath assembly constituency
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीची तयारी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सुरु केली आहे. अंबरनाथ विधानसभा मदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरच्या वतीने निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी शहर कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात भाजपालाच घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

४ वर्षांत भाजपची ताकद वाढली

आगामी विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपासंदर्भात सध्या शिवसेना आणि भाजप मित्रपक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. २०१४ च्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या निवडणुकीत भाजपा उमेदवार नवखा असतानाही २०४१ इतक्या कमी मताधिक्याने त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. ‘या निवडणुकीनंतर शहरातील भाजपचे प्राबल्य वाढल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. त्याचीच परिणती २०१५ च्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ ३ वरून ११ पर्यंत वाढण्यात दिसून आली’, असे भाजपचे शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी सांगितले.

किणीकरांच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज

गेल्या १० वर्षांपासून या मतदार संघातून शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे निवडून आलेले आहेत. त्यांच्या कार्यशैलीवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपकडून भाजपचे उद्योग प्रकोष्ठचे अध्यक्ष सुमेध भवार, नगरसेवक राजा वानखेडे, दिलीप जगताप, सुबोध भारत, मंजू धल आणि अन्य काहींनी आपली दावेदारी केली असून पक्षश्रेष्ठी ज्याला उमेदवारी देईल, त्या उमेदवारासाठी आम्ही काम करणार, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.