संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; कोलकातामधून एकाला अटक

आरोपीवर राऊत यांना इंटरनेट कॉलिंग केल्याचा आरोप केला जात होता.

शिवसेना नेते संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकीचा फोन आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी गुरुवारी कोलकाता मधून अटक केली असल्याची माहिती मिळतेय. दक्षिण कोलकाता येथील टॉलीगंगे भागातून पलाश बोस नावाच्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या पथकाने आरोपीला  गुरुवारी रात्री कोलकाता येथून अटक केली. आता त्याला मुंबईत आणण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आज दुपारी १ वाजता अलिपूर कोर्टात त्याला हजर करण्यात येणार होते. तसेच आरोपीवर राऊत यांना इंटरनेट कॉलिंग केल्याचा आरोप केला जात होता. यासह त्याने कंगना राणावत हिचे समर्थन करत संजय राऊत यांना धमकी करणारा फोन कॉल केला असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांना धमकीचे फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला असून हा फोन कॉल देशाबाहेरुन आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर कंगना राणावत प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा फोन मात्र भारतातून असल्याचे सांगितले जात आहे.


मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवारांना देखील आला धमकीचा फोन!