लेखी आश्वासनानंतर बेस्ट संप तुर्तास मागे

Mumbai
best-strike
संपला २० ऑगस्टपर्यंत स्थगित

बेस्ट कर्मचार्‍यांनी प्रलंबित वेतन करार आणि इतर मागण्यासंदर्भात ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मंगळवारी बेस्ट प्रशासनाने बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीबरोबर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत समितीबरोबर झालेल्या वाटाघाटी चर्चा सकारात्मक झाल्या आहेत. बेस्ट व्यवस्थापनाने २० ऑगस्टपर्यंत मुदत मागितली आहे. सोबतच बेस्टने कृती समितीला लेखी आश्वासन दिल्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांचा हा संप २० ऑगस्टपर्यंत मागे घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

जानेवारी महिन्यात कर्मचार्‍यांनी ९ दिवसांचा ऐतिहासिक संप केला होता. मात्र कोर्टाच्या मध्यस्थीने तो संप मिटला. त्यावेळी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या आदेशानुसार कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासनाने बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर वेळोवेळी चर्चा करणे आवश्यक होते, पण प्रशासन टाळाटाळ करत असल्यामुळे कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र बेस्ट महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्र कुमार बागडे यांनी बेस्ट कामगारांनी संप करू नये यासाठी मान्यताप्राप्त युनियनसह इतर युनियनच्या प्रतिनिधींबरोबर मंगळवारी बैठक बोलावली होती.

या बैठकीत युनियनबरोबर झालेल्या वाटाघाटी सकारात्मक झाल्या. त्याचबरोबर बेस्ट प्रशासनाने बेस्ट कृती समितीला लेखी आश्वासन दिले. या आश्वासनात 9 ते २० ऑगस्ट या 10 दिवसात बेस्ट प्रशासनाबरोबर बेस्ट कृती समितीच्या पाच बैठका होणार आहेत. या बैठकीत बेस्ट कामगारांचा प्रलंबित वेतन करार आणि इतर मागण्यासंदर्भात चर्चा करुन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन बेस्ट प्रशासनाने बेस्ट कृती समितीला लेखी स्वरूपात दिले आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपर्यंत बेस्ट कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याची घोषणा बेस्टच्या कामगारांचा मेळाव्यात बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे.

20 ऑगस्टला पुन्हा होणार बेस्ट कामगारांचा मेळावा
येत्या 20 ऑगस्टला पुन्हा परळच्या शिरोडकर हॉलमध्ये बेस्ट कर्मचार्‍यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात बेस्ट बरोबर झालेली चर्चा कर्मचार्‍यांच्या समोर मांडली जाणार आहे. या पाच बैठकीत बेस्ट कर्मचार्‍यांचा प्रलंबित वेतन करार आणि इतर मागण्यासंदर्भात तोडगा निघाला नाहीतर पुन्हा संपाची हाक देऊ, असा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बेस्टाला दिला आहे.