घरमुंबईअंबरनाथ रेल्वे आरक्षण केंद्राबाहेर तिकिटांचा काळाबाजार

अंबरनाथ रेल्वे आरक्षण केंद्राबाहेर तिकिटांचा काळाबाजार

Subscribe

अंबरनाथ रेल्वे आरक्षण केंद्रात लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करणारी एक टोळी सक्रिय आहे. या टोळीमुळे गरजू प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत. पहाटे पासूनच ही टोळी सक्रिय असते, दादागिरी करून ते आपल्या माणसालाच रांगेत सर्वप्रथम पाठवतात व त्याच्याकडून प्रति तिकीट दीड ते दोन हजार आकारणी करतात. यासंदर्भात स्थानिक भाजप नेते डॉ. मनोज कंदोई यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे तक्रार केली असता रेल्वे मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

अंबरनाथ रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी आरक्षण केंद्र असून, यात 4 काऊंटर आहेत. रोज उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश येथे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सकाळपासूनच प्रवाशांची आरक्षित तिकिटे मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. मात्र, याठिकाणी 10 ते 12 जणांची टोळी आधीच सक्रिय झालेली असते. ही टोळी प्रत्येक काऊंटरवरील किमान 2 तिकिटे म्हणजे दिवसातून 8 तिकिटांवर स्वतःचा कब्जा करतात. ही टोळी प्रत्यक्षात तिकिटे विकत घेत नाहीत, एका तिकिटामागे किमान दीड ते दोन हजार रुपये घेऊन ज्या व्यक्तीशी तिकिटांचा सौदा झाला त्यालाच प्रथम काऊंटरवर पाठवितात. इतर कोणालाही ही टोळी आधी जाऊ देत नाही. कोणी आत जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण करण्यात येते.

- Advertisement -

यासंदर्भात भाजप अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष डॉ. मनोज कंदोई यांच्याकडे सुनील मौर्य आणि इतर प्रवाशांनी तक्रार केली असता डॉ. कंदोई यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे ही बाब कळविली. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर रेल्वे सुरक्षा बल विभाग गेल्या 2 दिवसांपासून सीसीटीव्ही फुटेज आणि रांगेत असलेल्या लोकांची ओळखपत्रे तपासणी करीत असल्याची माहिती दिली आहे.

मात्र हा सर्व बनाव असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. रांगेत आधी जाण्याचा सौदा तिकिटांच्या रांगेचा काळाबाजार करणारी टोळी, आरक्षण केंद्राबाहेर रेल्वे पुलाखाली करीत असते. ज्यांच्याशी सौदा झाला त्यांनाच प्रथम पाठवले जाते. जेथे हे कटकारस्थान शिजते तिथे सीसीटीव्ही नाही त्यामुळे या टोळीचे चेहरे सीसीटिव्हीत येत नाहीत. रेल्वे सुरक्षा बल आणि या टोळीच्या संगनमताने हे घडते, असाही आरोप होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -