घरCORONA UPDATECorona: पालिका दवाखान्यांमधील डॉक्टर्सना ना पीपीई किट, ना वाहन, ना जेवणाची सोय!

Corona: पालिका दवाखान्यांमधील डॉक्टर्सना ना पीपीई किट, ना वाहन, ना जेवणाची सोय!

Subscribe

महापालिका प्रशासन प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय आणि विशेष रुग्णालयांमधील डॉक्टर्स तसेच नर्सेसची काळजी घेत असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी दवाखान्यांमधील डॉक्टर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे पुरतं दुर्लक्ष केलं आहे. दवाखान्यांमधील डॉक्टर्सना ‘पीपीई’ किट तर दूरची गोष्ट असून ना दुपारचे जेवण दिले जाते, ना घरपोच वाहनाची सुविधा! कोरोनाचे संकट डोक्यावर घोंघावत असताना प्राथमिक वैद्यकीय उपचार करणाऱ्या दवाखान्यांमधील डॉक्टर्सचे केवळ वाहनांअभावी दोन ते अडीच तास प्रवासातच निघून जातात. त्यामुळे महापालिका प्रशासन दवाखान्यांमधील डॉक्टर्सबाबत किती गंभीर आहे? याची खात्री पटत आहे.

एका बाजूला कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत जात असतानाच दुसरीकडे डॉक्टर्स आणि नर्सेसच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील नर्सेसने आपल्या ‘पीपीई’ किटसह येण्या जाण्यासाठी वाहनांची मागणी आदींबाबत महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मात्र, मुंबईत विविध प्रकारच्या आजारांवर प्राथमिक उपचार करणाऱ्या दवाखान्यांमधील डॉक्टर्सना कोणत्याही प्रकारचे ‘पीपीई’ किट देण्यात आलेले नाही. त्यामुळे विभागातील रुग्ण प्रथम दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जातात. त्याठिकाणी त्यांना ‘पीपीई’ किटचे देण्यात न आल्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांकडून डॉक्टर्सना बाधा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार

मुंबईसह इतर भागांमधील खासगी डॉक्टर्स आपले दवाखाने बंद करून घरी बसले आहेत. त्यामुळे रुग्णांचा भार महापालिकेच्या दवाखान्यांवर पडत आहे. त्यामुळे सध्या दवाखान्यांमधील हे सर्व डॉक्टर्स उपलब्ध असलेल्या अॅप्रन, हातमोजे, मास्क आणि कॅप आदींचा वापर करून जीव धोक्यात घालत रुग्णांवर उपचार करत आहेत.

मुंबई महापालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबईत १७५ दवाखाने चालवले जात आहेत. परंतु येथील काही डॉक्टर्सनी मांडलेली व्यथा भयानक आहे. दवाखान्यांमध्ये ‘पीपीई’किट तर उपलब्ध करून द्यायलाच हवेत. परंतु सध्या जर आमच्यासमोर कोणती प्रमुख अडचण असेल तर ती म्हणजे वाहनांची. महापालिकेच्या वॉर्डामध्ये ठाणे मार्गे आणि विरारमार्गे वाहने सोडण्यात येतात. तर मोजक्याच काही वॉर्डांमधून पनवेल वाशी मार्गे वाहने सोडली जातात. परंतु बेस्टच्या बसेस कमी असल्यामुळे अनेक वॉर्डामध्ये पनवेल, वाशी मार्गे बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या बसेस बदलत घर आणि कार्यालय गाठावे लागते. या प्रवासातच आमचा दोन ते अडीच तासांचा वेळ वाया जातो. जर आम्हाला अशा प्रकारे वाहने बदलत प्रवास करावा लागला, तर त्याचा नैसर्गिक परिणाम आमच्या मानसिकतेवर होतो. परिणामी आम्ही थकलो तर उपचार कसे करणार? असा सवाल डॉक्टर्सनी उपस्थित केला. बहुतांशी कर्मचारी हे पनवेल, वाशी तसेच उलवे आदी भागांमधील आहे. परंतु त्यांच्यासाठी वाहनांची सोय नसल्यामुळे कधी बेस्ट बस तर कधी टॅक्सी करत दवाखान्यांमध्ये रुग्णावर उपचार करण्यासाठी वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न हे डॉक्टर्स करत असतात.

- Advertisement -

दवाखाने अत्यावश्यक सेवा नाहीत का?

या पार्श्वभूमीवर ज्या प्रमाणे रुग्णालयांसाठी वाहने उपलब्ध करून दिली, त्याचप्रमाणे प्रत्येक विभागातील दवाखान्यांसाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करून दिल्यास डॉक्टर्सचा प्रवासाचा वेळ आणि त्रास कमी होईल. परंतु याबाबत वरिष्ठांना कल्पना देऊनही लक्ष दिले जात नसल्याची खंत दवाखान्यांमधील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विभागातील अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु आम्ही याबाबत विचारणा केली तेव्हा वॉर्डाचे अधिकारी हे जेवण दवाखान्यांसाठी नसल्याचे सांगतात. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर्सप्रमाणे आम्ही सेवा देत असतो. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री नागरिकांना आवाहन करत सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसून आल्यास थेट रुग्णालयात गर्दी न करता नजीकच्या दवाखान्यांमध्ये जाऊन उपचार घ्यावा, असे सांगत आहेत. परंतु महापालिका प्रशासनाचं दवाखान्यांमधील डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडेच लक्ष नसल्याने भविष्यात हीच यंत्रणा कोलमडून पडल्यास रुग्णालयातील वाढलेला ताण हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, अशीही भीती वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -