मुंबई महापालिकेत मेगाभरती; ३४१ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा!

मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर पदभरती करण्यात येणार असून त्यासाठी अर्जनोंदणीपासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ही ऑलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.

Mumbai
Online_Application
प्रातिनिधीक फोटो

मुंबई महापालिकेत यापूर्वी २४३ कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याची घोषणा करणार्‍या महापालिकेने आता या पदांमध्ये आणखी ९४ पदांची भर टाकत एकूण ३४१ कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/सिव्हील) पदाची एकूण २४३ तर यांत्रिकी आणि विद्युत विभागाच्या ९८ कनिष्ठ अभियंत्यांच्या पदांचा यामध्ये समावेश आहे. ही सर्व रिक्त पदे खुल्या तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून भरली जाणार असून यासाठी मागासवर्गीय उमेदवारांकडून ४०० रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ६०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर १५ दिवसांमध्ये या परीक्षेला सुरुवात केली जाणार आहे.

आचारसंहितेमुळे अडकली होती प्रक्रिया

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील स्थापत्य (सिव्हील), यांत्रिक (मेकॅनिकल) आणि विद्युत (इलेक्ट्रीक) या संवर्गातील कनिष्ठ अभियंता पदाची रिक्तपदे आता सरळ सेवा भरतीने भरली जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर एकूण ३४१ कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ३४१ कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीची पद्धत राबवण्यासाठी महापालिकेने आय.बी.पी.एस. या संस्थेची निवड केली असून या संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यासाठीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यापूर्वी २४३ कनिष्ठ अभियंत्यांची रिक्तपदे भरण्यासाठी जाहिरात दिल्यानंतर आचारसंहितेमुळे पुढील प्रक्रिया बारगळली होती. त्यामुळे आणखी काही रिक्तपदांचा समावेश करत आता ३४१ कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मंजुरीनंतर १० दिवसांत प्रक्रिया होणार सुरू

कनिष्ठ अभियंता पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता वयाची अट ३८ एवढी आहे तर मागासवर्गीय उमेदवाराकरता वयाची अट ४३ वर्षे आहे. मराठी विषय घेऊन उत्तीर्ण होणार्‍या उमेदवाराला या परिक्षेत भाग घेता येणार आहे. या परिक्षेत एकूण एक लाख अर्ज प्राप्त होतील, असे अपेक्षित आहे. भरती प्रक्रिया राबवणार्‍या आय.बी.पी.एस. या संस्थेमार्फत अर्ज स्वीकारणे, छाननी करणे, उमदेवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेणे, आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे आदींची कामे पार पाडली जाणार आहेत. यासाठी या संस्थेला प्रत्येक अर्जामागे ३५० रुपये आणि इतर कराची रक्कम अशाप्रकारे खर्च दिला जाणार आहे. महापालिका स्थायी समितीच्या बैठकीपुढे आगामी १३ नोव्हेंबर रोजी मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समितीने मान्यता दिल्यानंतर पुढील दहा दिवसांमध्ये ऑनलाईन भरती प्रक्रीयेला सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कुठे कराल अर्ज?

या पदासाठी खुल्या वर्गातील उमेदवाराला एस.एस.सी आणि पदविका अभ्यासक्रमांत ५० टक्के गुण तर सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी एस.एस.सी आणि पदविका अभ्यासक्रमांत ४५ टक्के एवढ्या गुणांची आश्यकता आहे. याबाबत http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये सर्व प्रकारच्या अटी व शर्तींसह अर्ज कशाप्रकारे भरायचा याची माहिती देण्यात आली आहे. परिक्षेची तारीखही समितीच्या मान्यनेनंतर याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ सिव्हील) : २४३ जागा
कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी व विद्युत ) : ९८ जागा
परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवार : ४०० रुपये
परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग उमेदवार : ६०० रुपये

10 प्रतिक्रिया

  1. मला हे कामाची मनापासून इच्छा आहे मला हे काम करायचे आहे आणि हे मी करून दाखवल

Comments are closed.