दालन वाटपात भुजबळ-शिंदेंमध्ये रस्सीखेच

एकनाथ शिंदे यांची बाजी

Mumbai
mantralaya
मंत्रालय

राज्यात ठाकरे सरकारचे कामकाज सुरु झाले असून सर्वांचे लक्ष हे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर लागून राहिले आहे. मात्र तिन्ही पक्षांचे अद्याप खातेवाटपाबाबत एकमत न झाल्याने नव्या राज्यसरकारला खातेवाटताचा मुहुर्त मिळालेला नाही. खातेवाटप झालेले नसतानाही सोमवारी राज्य सरकारतर्फे नव्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आज, मंगळवारी सर्व मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनाचे वाटप पूर्ण करुन घेतल्याने आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीमधील तिसर्‍या मजल्यावरील दालनासाठी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच होती. अखेर हे प्रशस्त दालन शिंदे यांना मिळाले आहे. तर भुजबळांच्या वाट्याला मुख्य इमारतीत दुसर्‍या मजल्यावरील दालन आले आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे नवे सरकार स्थापन करण्यात आले आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांना प्रशासनाकडून नुकतेच बंगल्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर मंत्र्यांची मंत्रालयातील दालनासाठी धावपळ सुरु केली होती.

मंगळवारी या मंत्र्यांचे मंत्रालयातील दालनांबाबत अंतिम निर्णय घेऊन त्याचे वाटपही करण्यात आले. मुळात कोणत्याही मंत्र्यांचे खाते निश्चित झालेले नसताना दालनांचे वाटप करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शेजारी कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र या दालन वाटपात कोणालाही सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यां शेजारी दालन न दिल्याने या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रथेनुसार सहाव्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना सहाव्या मजल्यावरील दालन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांना मंत्रालयातील विस्तृत इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील ३०२ ते ३०७ हे दालन देण्यात आले आहेत. तर जयंत पाटील यांना देखील मंत्रालयातील विस्तृत इमारतीतील सहाव्या मजल्यावरील ६०७ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. शिवसेनेच्या सुभाष देसाई यांना पाचव्या मजल्यावर मध्य माजूला असलेले दालन देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना मुख्य इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांना अनुक्रमे १ ला मजल्यावरील १०८ आणि चौथ्या मजल्यावरील ४०२ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शेजारचे दालन नको रे बाबा…
मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालना शेजारी असलेले दालन हे मंत्रालयात अपशकुनी मानले जाते. जो मंत्री या दालनात आला तो फार काळ मंत्रिमंडळात राहत नाही, अशी चर्चा नेहमीच मंत्रालयात असते. त्यामुळे ते दालन घेण्यास कुठलाही मंत्री तयार नसतो. भाजपचे मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना ते दालन मिळाले होते. पण त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावे लागले होते. त्यामुळे हे दालन कोणत्याही मंत्र्याला नको आहे.