घरमुंबईराम कदमच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक

राम कदमच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक

Subscribe

आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर आता संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी राम कदम यांच्यावर सडकून टीका केली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर राम कदम यांनीही व्हिडिओ जारी करून माफी मागितली आहे.

सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विशाल जनसंघर्ष सभेत बोलत होते. तर भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांचे निलंबन करावे आणि पक्षातून हकालपट्टी सुद्धा करावी, असे मत कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.

सत्ता आणि पैशाची मस्ती

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज सहाव्या दिवशी पुणे जिल्ह्यात पोहोचली. गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. इंदापूर येथे जाहीर सभेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळात भाजपवाल्यांनी देशाला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारातून अफाट पैसा कमावला आहे. सत्ता आणि पैशाच्या मस्तीमुळे भाजपचे नेते उन्मत झाले आहेत त्यामुळे त्यांना सामान्यांचे हाल दिसत नाहीत. बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. रोजगार मागितला तर पंतप्रधान पकोडे विका असे सांगून थट्टा करतात. राज्य सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. भाजप सरकार पश्चिम महाराष्ट्रावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहेत. ज्या सहकार चळवळीमुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला ती सहकारी चळवळ आणि साखर उद्योग मोडून काढण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालवला आहे. इंदापूरच्या जागेबाबत आपण स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून तुम्ही हर्षवर्धन पाटील यांच्यागे ठामपणे उभे रहा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उपस्थितांना केले.

- Advertisement -

दहीहंडी उत्सवादरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. हा सत्तेचा आणि पैशाचा माज आहे. संपूर्ण महिला समाजामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राम कदम यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांचे निलंबन करावे. तसेच पक्षातून हकालपट्टीसुद्धा करावी. संपूर्ण महिला समाजाचा हा अपमान आहे. महिलांविषयी असे बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांना आमदारकीच्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणून मुख्यमंत्रांनी त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी. मी महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गाला असे आवाहन करत आहे कि त्यांनी या वक्तव्याचा निषेध म्हणून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करू नये. या प्रकरणाचा राग मनात जिवंत ठेऊन एकाही तरुणींचे व महिलांचे मत भाजपाला मिळता कामा नये.
– संजय निरुपम, मुंबई अध्यक्ष, कॉंग्रेस

विधानसभेचे कामकाज होऊ देणार नाही

भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले विधान माता-भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर विधानसभेचे आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. ते म्हणाले की, राम कदम यांच्यावर कारवाई होत नाही, तोवर विधानसभेचे कामकाज न चालू देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. एकिकडे देशाचे पंतप्रधान ‘बेटी बचाओ’चा नारा देतात आणि त्यांचे आमदार मात्र ‘बेटी भगाओ’ची घोषणा करतात. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून, काँग्रेस पक्ष त्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करीत असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. दरम्यान, इंदापूर येथील सभेला प्रारंभ होण्यापूर्वी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रावण कदम’च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

- Advertisement -

राम कदमने दिलगिरी व्यक्त केली 

दरम्यान, दोन दिवसांपासून आमदार राम कदम यांच्यावर चहू बाजूंनी होणाऱ्या टिकेनंतर आज सकाळी त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची माफी मागितली. तर सायंकाळी एक व्हिडिओ जारी करून पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली. काय म्हणाले राम कदम,

माझ्या घाटकोपरच्या दहीहंडीत मी काय बोललो याचा अर्धवट व्हिडीओ दाखवला आणि पसरवला तरी सुद्धा त्याचे विवेचन न करता महाराष्ट्रातील सगळ्या माता-भगिनी यांचा सन्मान माझ्यासाठी लाखमोलाचा आहे, सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे कोणताही खुलास न करता अत्यंत नम्रपणे दिलगीरी व्यक्त करतो.

– राम कदम, आमदार, भाजप 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -